पावसाअभावी उसाची वाढ खुंटली
By Admin | Updated: July 30, 2014 00:47 IST2014-07-29T23:50:35+5:302014-07-30T00:47:34+5:30
पाथरी : यावर्षी सुरुवातीपासून पाऊस पडला नाही़ गतवर्षी या परिसरात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी उसाची मोठी लागवड केली होती;

पावसाअभावी उसाची वाढ खुंटली
पाथरी : यावर्षी सुरुवातीपासून पाऊस पडला नाही़ गतवर्षी या परिसरात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी उसाची मोठी लागवड केली होती; परंतु, यावर्षी जूनमध्ये पाऊस न पडल्याने उसाची वाढ पूर्णत: खुंटली आहे़ परिणामी ऊस उताऱ्यामध्ये मोठी घट येणार असल्याचे दिसून येत आहे़
पाथरी तालुका हा उसाचे भांडार म्हणून ओळखला जातो़ गोदावरी नदी पात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे बांधण्यात आलेले बंधारे आणि या तालुक्यातून जायकवाडीचा डावा कालवा गेल्यामुळे या भागात सिंचनाचे क्षेत्र मोठे आहे़ या भागातील शेतकरी प्रामुख्याने कापसाच्या पिकासोबतच ऊसाचीही लागवड करतो़ या तालुक्यात लिंबा येथील योगेश्वरी शुगर आणि पाथरी येथील रेणुका शुगर हे दोन कारखाने आहेत़ गतवर्षी पाथरीचा रेणुका शुगर कारखाना सुरू झाला नव्हता़ गतवर्षी चांगला पाऊस पडल्याने जमिनीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती़ नदी, नाले ओसंडून वाहिले़ गोदावरी पात्रातील दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरले़ त्यामुळे या तालुक्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१३ या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड झाली़ पाथरी कारखाना कार्यक्षेत्रात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी ५ हजार मे़ टन क्षमतेचे बियाणे खरेदी करून ऊस लागवड केली़ सध्या सात महिन्यांचा ऊस असला तरी उसाची मोठी वाढ झाली नाही़ शेतातील उभा ऊस आठ ते दहा कांड्यावर आहे़ यामुळे उसात सध्या तरी परिपक्वता आली नाही़ जून आणि जुलै या दोन महिन्यांत पाऊसच न पडल्यामुळे उसाची वाढ खुंटली़ परिणामी ऊस उताऱ्यावर याचा परिणाम होणार आहे़ (वार्ताहर)
२० टनांचाही उतारा नाही
या भागातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर उसाची लागवड केली़ महागडे बियाणे खरेदी करून मोठा खर्चही केला़ परंतु, पाऊस पडत नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या उसाला प्रती एकर २० टनापेक्षा अधिक उतारा येणार नाही़, अशी प्रतिक्रिया रेणापुरी येथील ज्येष्ठ ऊस उत्पादक शेतकरी दत्तराव टेंगसे यांनी दिली़