कामे बांधकाम विभागाकडे सुपुर्द करा
By Admin | Updated: July 17, 2014 01:07 IST2014-07-17T01:00:09+5:302014-07-17T01:07:33+5:30
जालना : जिल्हा क्रिडा संकुलाची कामे खाजगी वास्तूविशारदांऐवजी बांधकाम खात्याकडूनच करुन घ्यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. रंगानायक यांनी दिले आहेत.

कामे बांधकाम विभागाकडे सुपुर्द करा
जालना : जिल्हा क्रिडा संकुलाची कामे खाजगी वास्तूविशारदांऐवजी बांधकाम खात्याकडूनच करुन घ्यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. रंगानायक यांनी दिले आहेत.
जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, क्रीडाधिकारी उर्मिला मोराळे, प्रभारी शिक्षणाधिकारी अशोक राऊत, रामदास शेवाळे, ईश्वर वसावे उपस्थित होते.
यावेळी क्रीडा संकुलातील बांधकामाचा आढावा घेण्यात आला. सर्वे नं. ४८८ मध्ये या जिल्हा क्रीडा संकुलासाठी २५ एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जागेवर १९९८-९९ यावर्षी एक कोटी ९५ लाख ५५ हजार रुपये खर्च करुन प्रशासकीय इमारत, खुले प्रेक्षागृह, विविध खेळाची मैदाने, बहुउपयोगी हॉल, ४०० मीटरचा धावण्याचा मार्ग, व्यायाम शाळा, हॉल आदींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
दरम्यान, शासनाच्या २००१ च्या क्रीडा धोरणानुसार राज्य शासनाने २००३ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार चार कोटी रुपये खर्चाची जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाची योजना आहे. या निर्णयानुसार जुन्या बाबीसह नव्या बाबींचा समावेश करुन चार कोटी २१ लाख १५ हजार रुपयांचा प्रस्ताव क्रीडा संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार २००५-२००६ वर्षामध्ये ५० लक्ष, २००६-२००७ या कालावधीत चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून शासन निर्णयाप्रमाणे खाजगी वास्तूविशारदाच्या मदतीने कामे हाती घेण्यात आली होती, अशी माहिती मोराळे यांनी दिली.
खाजगी वास्तूविशारदाकडून कामे करुन घेण्यास अडचणी येत असल्याने त्यांच्याकडील या सेवा खंडित करुन घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे करुन घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या बैठकीत प्रशासकीय खर्चासाठी प्राप्त निधीच्या खर्चास मान्यता आदींवर चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बाबींचा तपशीलवार आढावा घेतला. (प्रतिनिधी)
८ कोटींपैकी १ कोटी १७ लाखांचा निधी प्राप्त
२१ मार्च २००९ च्या शासन निर्णयानुसार क्रीडा संकुल योजना आठ कोटी रुपयांची झाली आहे. त्यानुसार सुधारित अंदाजपत्रक आणि आराखडा तयार करुन सुधारित प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. त्यास क्रीडा संचालकांनी ११ एप्रिल २००१ मध्ये प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामासाठी आतापर्यंत एक कोटी १७ लाख ५० हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे.
यापूर्वीचे चार कोटी आणि आताचे एक कोटी १७ लाख ५० हजार रुपये असे एकूण पाच कोटी १७ लाख ५० हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. आतापर्यंत तीन कोटी ३५ लाख ९४ हजार रुपयाची कामे पूर्ण झाली असून चार कोटी ३१ लाख १५ हजार रुपयाची कामे करावयाची आहेत.