अळ्यायुक्त दह्यामुळे विद्यार्थ्यांना उलट्या !

By Admin | Updated: April 20, 2015 00:31 IST2015-04-20T00:28:13+5:302015-04-20T00:31:32+5:30

उस्मानाबाद : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात देण्यात आलेल्या दह्यामध्ये अळ्या निघाल्याची घटना १८ एप्रिल रोजी घडली होती.

Students use voracious sugarcane! | अळ्यायुक्त दह्यामुळे विद्यार्थ्यांना उलट्या !

अळ्यायुक्त दह्यामुळे विद्यार्थ्यांना उलट्या !


उस्मानाबाद : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात देण्यात आलेल्या दह्यामध्ये अळ्या निघाल्याची घटना १८ एप्रिल रोजी घडली होती. हे दही काही विद्यार्थ्यांच्या खाण्यामध्ये आले होते. यापैकी दोघांना जुलाब, उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह सुरू करण्यात आले. येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवणासोबतच अन्य सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. यासाठी शासन वर्षाकाठी कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. परंतु, प्रशासनाच्या संवेदनाहीन धोरणामुळे शासनाच्या या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम होत आहे. वसतीगृहातील विद्यार्थी जेवणाबाबत वारंवार तक्रारी करीत आहेत. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ नोटिसांचा खेळ मांडला आहे. काही तक्रार आली की पंचानामा करायचा आणि संबंधित भोजन पुरवठादारास व कर्मचाऱ्यास नोटीस देवून मोकळे व्हायचे, हेच धोरण मागील अनेक महिन्यांपासून अवलंबिले आहे. कुठल्याही स्वरूपाची ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदारही अधिकाऱ्यांच्या या नोटिसांना भिक घालत नसल्याचे समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी ठेकेदाराला १९ एप्रिल रोजी दिलेल्या नोटिसेतून समोर आले आहे.
प्रशासनाच्या या बोटचेप्या धोरणामुळेच ठेकेदारही फारसे गंभीर होत नसल्याने हे प्रकार सातत्याने घडत आहेत. समाजकल्याण विभागाकडे तक्रारी करूनही काहीच फरक पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून कैफियत मांडली. त्यावर तपासणीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांची नियुक्ती करून १७ एप्रिल रोजी तपासणी केली. हे पथक सर्व चौकशी करून आल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी म्हणजेच १८ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांच्या जेवणातील दह्यामध्ये अळ्या निघाल्या. या अळ्या एका विद्यार्थ्याच्या नजरेस आल्या. तोवर दोन ते तीन विद्यार्थ्यांनी हे दही खालले होते. यापैकी बामणी येथील सुदर्शन सिरस या विद्यार्थ्यास काही वेळानंतर जुलाब, उलट्यांचा त्रास होवू लागल्यानंतर त्यास जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर रविवारी पहाटेच्या सुमारास अविनाश शिवाजी कांबळे या विद्यार्थ्याला जुलाब, उलट्यांचा त्रास होवू लागल्याने त्यालाही रूग्णालयात भरती करण्यात आहे. या दोघांवरही उपचार सुरू आहेत. त्यांची पकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या गलथान कारभाराबाबत पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
लग्नातील शिल्लक राहिलेली भाजी खाण्यासाठी दिली, फळेही निकृष्ट दर्जाची दिली, मांसाहार चांगल्या दर्जाचा नसतो, दूधही भेसळयुक्त असते, अशा एक ना अनेक तक्रारी हे विद्यार्थी अधिकाऱ्यांकडे करतात. परंतु, आजवर नोटिसा बजावण्यापलिकडे प्रशासनाने काही केलेले नाही. त्यामुळेच संबंधित ठेकेदाराला नेमके कोणाचे अभय आहे? असा प्रश्न आता पालकांतून उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या जिविताशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यास वरिष्ठ अधिकाऱ्याचे हात का कच खात आहेत? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहेत.

Web Title: Students use voracious sugarcane!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.