सुखापुरी येथे विद्यार्थ्यांनी बस अडविली
By Admin | Updated: July 22, 2014 00:17 IST2014-07-21T23:38:40+5:302014-07-22T00:17:37+5:30
सुखापुरी : येथे बस वेळेवर येत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी बस आडवून आपला निषेध व्यक्त केला.

सुखापुरी येथे विद्यार्थ्यांनी बस अडविली
सुखापुरी : येथे बस वेळेवर येत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी बस आडवून आपला निषेध व्यक्त केला.
तालुक्यातील सुखापुरी, कुक्कडगाव, बेलगाव, लखमापुरी येथून दररोज अंबड येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी सकाळी ६१ विद्यार्थी सुखापुरी येथील बसस्थानकावर येऊन थांबतात. मात्र, वेळेवर बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना तासिकादेखील करता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
महाविद्यालयीन तासिका सकाळी ७.४५ वाजता सुरू होतात व विद्यार्थ्यांना अंबडला यायला किमान १० वाजतात. कारण तीर्थपुरी येथून येणाऱ्या भोगाव (मुरमा), मंगरूळ या दोन्ही बसगाड्या भरगच्च भरून येतात व याआधी जाणारी साडेगाव बसदेखील थांबत नसल्याने उशिरा येणाऱ्या बसमधून धक्के खात अंबडला जावे लागत आहे.
अंबड आगारप्रमुखांना सांगूनही एस.टी. बस सुरू न झाल्याने वैतागून विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सुखापुरी येथे बस अडविली व जोपर्यंत पर्यायी बससेवा सुरू होत नाही, तोपर्यंत बस सोडणार नाही, असे भ्रमणध्वनीवरून स्थानकप्रमुख पी.टी. राठोड यांच्याशी बोलणे झाले. मात्र, बसमध्ये १२० पैकी केवळ ३० प्रवासी व सर्व पासधारक विद्यार्थी असल्याने बस सोडण्यात आली. सोमवारी सकाळी सर्व ६१ विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा पर्यायी बस सुरू करावी, म्हणून आगार प्रमुखांना निवेदन दिले. या निवेदनावर संभाजी शिंदे, मोईन तांबोळी, संदीप लहुटे, श्रीकांत लुलेकर, शीतल राखुंडे, सोनाली पानखडे, जयश्री राखुंडे, साधना कवडे, मनीषा परमेश्वर, रेणुका पाटील, रेखा शिंदे, शंकर गायकवाड, शिवप्रसाद मोताळे, योगेश भाकड, जितेंद्र पैठणकर, राम भाकड, माधव फाटक, निहाल पठाण यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)
दोन दिवसांत बसची व्यवस्था
या संदर्भात स्थानकप्रमुख पी.टी. राठोड यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, दोन दिवसांत सुखापुरीसाठी अतिरिक्त बसची विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात येईल व अंबडहून ६.३० ला सुखापुरी व ७.१५ वाजता सुखापुरीहून ही बस अंबडसाठी निघेल, असे सांगितले.