विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या, औरंगाबादेतील १७ आयटीआयमध्ये समुपदेशन फेरीसाठी ९८० जागा
By योगेश पायघन | Updated: August 29, 2022 11:51 IST2022-08-29T11:51:13+5:302022-08-29T11:51:50+5:30
रिक्त जागांचा तपशील आज जाहीर होणार; विद्यार्थ्यांनी लाॅगिनमधून नोंदणी करणे आवश्यक

विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या, औरंगाबादेतील १७ आयटीआयमध्ये समुपदेशन फेरीसाठी ९८० जागा
औरंगाबाद : जिल्ह्यातील १७ औद्योगिकी प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) केंद्रीय प्रवेशाच्या चाैथ्या फेरीअखेर १५७६ (६१.६६ टक्के) प्रवेश निश्चित झाले. ९८० जागा रिक्त आहेत. शासकीय आयटीआयमध्ये ६८.०४ टक्के, खासगीत केवळ ३३.४७ टक्के प्रवेश झाले. उर्वरित रिक्त जागांसाठी संस्था स्तरावरील समुपदेशन फेरीसाठी जागांचा तपशील सोमवारी (आज सायंकाळी) संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ११ शासकीय आयटीआय असून, त्यात २ हजार ८४ जागा आहेत. तर ६ खासगी आयटीआय असून त्यात ४७२ जागा अशा एकूण २५५६ जागा आहेत. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रेल्वे स्टेशन परिसर या सर्वात मोठ्या संस्थेत ३० ट्रेड आणि ५२ युनिटमध्ये ११२५ जागा आहेत. त्यापैकी ७३० (६६.१२ टक्के) जागा भरल्या गेल्या असून, ३७४ पदे रिक्त आहेत. रिक्त जागांवर समुपदेशन फेरीसाठी ३० व ३१ ऑगस्ट रोजी समुपदेशन फेरीसाठी विद्यार्थ्यांनी लाॅगिनमधून नोंदणी करावी. १ सप्टेंबर रोजी गुणवत्ता यादी, २ सप्टेंबर रोजी प्रवेशासाठीच्या जागांचे वाटप, ५ सप्टेंबरपर्यंत या विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांसह प्रवेशासाठी प्रत्यक्ष हजर राहायचे आहे, असे मराठवाड्याचे प्रवेश समन्वयक अमित पुजारी यांनी सांगितले.
शासकीय आयटीआयच्या ६०५ जागा रिक्त
शासकीय आयटीआय कन्नड येथे १८, सोयगाव १८ , खुलताबाद ३८, पैठण ६१, सिल्लोड ३७, वैजापूर ११, फुलंब्री ५, औरंगाबाद किलेअर्क २७, औरंगाबाद महिला १६ तर रेल्वे स्टेशन येथील आयटीआयमध्ये ३७४ जागा अशा ६०५ तर खासगी आयटीयमध्ये ३७५ अशा ९८० जागा रिक्त आहेत.