जालना : गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी डी.एड. अभ्याक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र प्रकर्षाने दिसून येत असून, जिल्ह्यात उपलब्ध ९५० जागांसाठी केवळ २८१ विद्यार्थ्यांचेच अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने (डाएट) २ जूनपासून यावर्षीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली. १६ जूनपर्यंत ही प्रवेशाची अंतिम तारीख होती. या मुदतीत शेवटच्या तारखेपर्यंत जिल्ह्यात ९५० प्रवेशक्षमता असताना फक्त २८१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. जिल्ह्यात एकूण १३ अध्यापक विद्यालय आहेत. त्यापैकी १ शासकीय तर १२ विद्यालय खाजगी विनाअनुदानित आहेत. त्यामध्ये जालना तालुक्यात-४, घनसावंगी-१, परतूर-२, मंठा-३, भोकरदन तालुक्यात २ असे एकूण १३ अध्यापक विद्यालय आहेत.शासनाने १९९० पासून विनाअनुदानित तत्त्वावर राज्यभरात डी.एड.च्या अनेक महाविद्यालयांना मान्यता दिली. या कॉलेजमधून दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडत होते. त्यामुळे डी.एड. प्रशिक्षणार्थ्यांची संख्या भरमसाठ वाढली. परिणामी, शाळेतील दोन ते चार जााांसाठी शेकडो उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू लागले. जिल्ह्यात गेल्या ५ ते ६ वर्षांपासून हजारो डी.एड.धारक विद्यार्थी नोकरीपासून वंचित आहेत. सध्या तर अनेक शिक्षक पटपडताळणीदरम्यान अतिरिक्त ठरल्यामुळे समायोजनासाठी प्रक्रिया जिल्ह्यासह राज्यभरात सुरू आहे. परिणामी, राज्य शासनाने अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकभरती तूर्तास थांबविली आहे. फक्त विनाअनुदानित शाळेतील शिक्षक भरतीला मान्यता आहे.गेल्या दहा वर्षांत डी.एड. महाविद्यालयाची संख्या वाढली आहे. हजारो उमेदवार डी.एड. होऊन बाहेर पडत आहे. जागा कमी आणि उमेदवार जास्त झाल्याने नोकरीची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे विद्यार्थी डी.एड.कडे येत नसल्याचे ‘डाएट’च्या प्राचार्या डॉ. अचला जडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मानधन नसल्यामुळे शिक्षकही हवालदिलगेल्या सात-आठ वर्षांपासून अनेक डी.एड. प्रशिक्षणार्थी थोड्याफार प्रमाणात खाजगी, विनाअनुदानित शाळेवर कार्यरत आहेत. त्यांना नियमित मानधनही मिळत नसल्याने हे युवक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे डी.एड.कडे उमेदवारांनी पाठ फिरविली आहे.
डी.एड.कडे विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ
By admin | Updated: June 23, 2014 00:26 IST