छत्रपती संभाजीनगर: विद्यार्थी काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज रेल्वेस्टेशनवर अचानक रेल्वेरोको आंदोलन केले. यावेळी नगरसोल -नरसापुर एक्सप्रेस रोखण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला, मात्र रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत रेल्वे रवाना केली. जोरदार घोषणाबाजीमध्ये झालेल्या या आंदोलनामुळे रेल्वे स्टेशनवर काही काळ तणावाचे वातावरण होते.
'मत चोरी'च्या विरोधात सोमवारी इंडिया आघाडीचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलन सहभाग खासदारांसह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. याचा विरोध विद्यार्थी काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे रेल्वेरोको आंदोलन केले. यावेळी काही आंदोलक हे थेट रेल्वेचे इंजिनवर चढले होते. हातातील फलक दाखवत जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई करण्यात येत आहे.