कडक सुरक्षा व्यवस्था नावालाच; उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय फोडून चोरट्यांनी दारू लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 12:56 IST2021-04-10T12:56:16+5:302021-04-10T12:56:36+5:30
शासकीय दूध डेअरीमागे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांचे कार्यालय आहे. तेथेच भरारी पथकाचे निरीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांचीही कार्यालये आहेत.

कडक सुरक्षा व्यवस्था नावालाच; उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय फोडून चोरट्यांनी दारू लांबविली
औरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून दारू तस्करांकडून जप्त केलेल्या दारूसाठ्यापैकी २ लाख ४५ हजार ८१६ रुपयांची दारू चोरट्यानी लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. विशेष म्हणजे ही चोरी जेथे झाली त्याठिकाणी जवानाचा रात्रंदिवस खडा पहारा असतो. या चोरीचा त्याला सुगावा मात्र लागला नसल्याने या घटनेविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली.
शासकीय दूध डेअरीमागे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांचे कार्यालय आहे. तेथेच भरारी पथकाचे निरीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांचीही कार्यालये आहेत. जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई केल्यावर जप्त केलेली देशी, विदेशी बनावटीची दारू येथील मुद्देमाल कक्षात जमा करून ठेवली जाते. अनेक वर्षांपासूनचा मुद्देमाल तेथे ठेवण्यात आलेला आहे. मुद्देमाल सांभाळण्यासाठी उत्पादन शुल्कचा जवान (कॉन्स्टेबल) रात्रंदिवस तेथे तैनात असतो. असे असताना चोरट्यांनी मुद्देमाल कक्षाचा पत्रा उचकटून दारूचे बॉक्स लंपास केले. शुक्रवारी सकाळी सुरक्षा रक्षक जवान एम.एच. बहुरे यांना ही घटना नजरेस पडल्यावर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब कळविली. यानंतर भरारी पथकाचे निरीक्षक ए.जी. कुरेशी यांनी रात्री उशिरा क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली.
गुन्हे शाखेने पकडले चोरटे
गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाला या चोरीविषयी माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी संशयिताच्या घराबाहेर २०१६ साली बनलेल्या देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसल्या. पोलिसांनी संशयावरून पवन चावरिया याच्या घरावर छापा टाकला असता त्याने तेथे देशी दारूचे सात बॉक्स जप्त केले. त्यांनी अन्य आरोपी राहुल घुसर, सूरज चावरिया आणि गोकुळ कागडा यांची नावे सांगितली. उत्पादन शुल्क विभागाच्या मुद्देमाल गोडाऊनमधून हा माल चोरून आणल्याचे त्याने सांगितले.