दुसऱ्या दिवशीही वलांडीत तणाव
By Admin | Updated: June 28, 2014 01:16 IST2014-06-28T00:39:26+5:302014-06-28T01:16:11+5:30
वलांडी : पोलिसी वसुलीच्या आरोपावरून वलांडीत गुरुवारी तणाव निर्माण झाला होता़ त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले़ पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ
दुसऱ्या दिवशीही वलांडीत तणाव
वलांडी : पोलिसी वसुलीच्या आरोपावरून वलांडीत गुरुवारी तणाव निर्माण झाला होता़ त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले़ पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ शुक्रवारी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली़ त्यामुळे शुक्रवारचा आठवडी बाजार भरु शकला नाही़ परिणामी, दिवसभर तणावाचे वातावरण होते़
वाहन तपासणीच्या नावाखाली वसुली होत असल्याचा आरोप करत त्या विरोधात उतरलेल्या वाहनचालक व प्रवाशांवर पोलिसांनी गुरुवारी लाठीमार केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलिसावर दगडफेक करून दुचाकी पेटविली़ परिणामी गुरुवारी दिवसभर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ पोलिस अधीक्षक बी़ जी़ गायकर यांच्यासह पोलिस उपअधीक्षक तिरुपती काकडे, डॉ़ अश्विनी शेलार, उपविभागीय अधिकारी वैशाली शिंदे यांनी गावास भेट देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याबरोबरच शांतता राखण्याचे आवाहन केले़
गावातील तणावाच्या वातावरणामुळे व्यापाऱ्यांनी गुरुवारी आपली दुकाने बंद ठेवली होती़ शुक्रवारी पुन्हा व्यापाऱ्यांनी घटनेस जबाबदार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आपली दुकाने बंद ठेवली़ त्यामुळे त्याचा परिणाम आठवडी बाजारावरही झाला़ संपूर्ण गाव बंद असल्याने दुसऱ्याही दिवशी गावात तणावाचे वातावरण होते़
दरम्यान, वलांडी येथील व्यापारी कमिटीच्या सदस्यांनी राज्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन गावात घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे़ गावातील घटनेस जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करुन न्याय द्यावा, अशी मागणी केली़ दरम्यान, गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला असून, गावाला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे.
ग्रामस्थ आणि पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल...
वलांडी येथे गुरुवारी पोलिस व नागरिकांत झालेल्या धुमश्चक्रीनंतर रात्री देण्यात आलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
पोलिस उपनिरीक्षक समाधान कवडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलिस निरीक्षक एस़एस़ आम्ले यांच्या सूचनेवरून वाहन तपासणी आम्ही व राज्य राखीव दलाचे जवान वलांडी चौकात करीत होतो़ तेव्हा अज्ञात पंधरा ते वीस जणांनी शासकीय वाहन (एमएच २४, ७५५३) वर दगडफेक केली़ तसेच पोलिसांची दुचाकी (एमएच २४, बी़ ७७६६) जाळली़ मला व कर्मचाऱ्यास काठीने मारहाण करीत धक्काबुक्की केली़ या प्रकरणी आरोपीविरूद्ध कलम १४७, १४८, १४९, ३२३, ३५३, ३३२, ४३२, ४२७, ५०४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
रावसाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी घराकडून शेताकडे जात असताना माजी दुचाकी अडवून कागदपत्रे व पैशाची मागणी करीत पोलिस उपनिरीक्षक समाधान कवडे व राज्य राखीव दलाच्या जवानांनी काठीने मारहाण केली़ या मारहाणीत जखमी झाले असल्याचे रावसाहेब पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संबंधित पोलिसांवर कलम ३२४, ३२३, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
५ पोलिसांच्या बदल्या
वलांडी येथे गुरुवारी घडलेल्या घटनेप्रकरणी शुक्रवारी वलांडी दूरक्षेत्राच्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़ यात पोहेकॉ अभंग माने, पोकॉ जितेंद्र पाटील, कॉन्स्टेबल नामदेव सारोळे, श्याम दुड्डे यांचा समावेश आहे़ गुरुवारी वलांडी येथे वसुलीच्या आरोपावरुन ग्रामस्थ आणि पोलिसांत धुमश्चक्री झाली़ त्यामुळे गावात दोन्हीही दिवशी तणावाचे वातावरण होते़ या घटनेप्रकरणी गुरुवारी पोलिस निरीक्षक एस़ एस़ आम्ले, पोलिस उपनिरीक्षक समाधान कवडे यांची तात्काळ कंट्रोल रुमला बदली करण्यात आली आहे. शुक्रवारी गावात पुन्हा तणावाचे वातावरण असल्याचे पाहून आणि ग्रामस्थांच्या रेट्यामुळे देवणी पोलिस ठाण्यातंर्गत असलेल्या वलांडी दूरक्षेत्रातील पाच पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या देवणी पोलिस ठाण्यात करण्यात आल्या असल्याचे पोलिस उपाधीक्षक डॉ़ अश्विनी शेलार यांनी सांगितले़ घटनेच्या चौकशीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून सूचना येताच पुढील कारवाई करण्यात येईल, असेही डॉ़ शेलार म्हणाल्या़