बापाकडून जगण्याचे बळ; तर विद्यापीठातील बापमाणसांनी लेखनाला पाठबळ दिले: इंद्रजीत भालेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:33 IST2025-03-21T15:30:32+5:302025-03-21T15:33:12+5:30

प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्याकडून विद्यापीठातील आठवणींना उजाळा

Strength to survive from farmer father; while Dr. BAMU university fathers like professor supported writing: Indrajit Bhalerao | बापाकडून जगण्याचे बळ; तर विद्यापीठातील बापमाणसांनी लेखनाला पाठबळ दिले: इंद्रजीत भालेराव

बापाकडून जगण्याचे बळ; तर विद्यापीठातील बापमाणसांनी लेखनाला पाठबळ दिले: इंद्रजीत भालेराव

छत्रपती संभाजीनगर : माईचा पदर धरून लहानाचा मोठा होत असताना माझ्या शेतकरी बापाने जगण्याचे बळ दिले तर विद्यापीठात मराठी विभागातील बापमाणसांनी लेखनाला पाठबळ दिले. त्यामुळे माझ्यासारखा गावखेड्यातला माणूस अगदी महानगरातही लोकप्रिय कवी होऊ शकला, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग व विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या समाराेप बुधवारी झाला. प्रा. वा. ल. कुलकर्णी व्याख्यानमालेचे पुष्प गुंफताना प्रा. भालेराव यांनी 'विद्यापीठातील भारलेले दिवस' या विषयावर युवकांशी संवाद साधला. यावेळी विभागप्रमुख कवी डॉ. दासू वैद्य, विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभूरे यांची उपस्थिती होती.

प्रा. भालेराव म्हणाले, प्रा. वा. ल. कुळकर्णी यांनी मराठी विभागाला वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी समीक्षक आणि साहित्यिकांची एक वेगळी फळी निर्माण केली आणि माणसं घडवली. जी आज त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोठ्या पदावर काम करत आहेत. खरंतर विभागात इतके ज्ञानी प्राध्यापक होते की, त्यांच्या शिकवण्यामुळे आम्ही मनसोक्त जगायला शिकलो. आजही येथे पुन्हा पुन्हा यावे वाटते, कारण इथेच पहिली कविता लिहिली आणि इथेच माणसं वाचायला शिकलो. मराठी विभागात नामवंत प्राध्यापक होते. त्यात प्रा. वा. ल. कुलकर्णी, डॉ. यु. म. पठाण, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. एस. एस. भोसले, डॉ. प्रभाकर भांडे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा समावेश होता. प्रास्ताविक डॉ. दासू वैद्य यांनी केले. संचालन हनुमान गिरी यांनी केले. आभार राजश्री काळे यांनी मानले.

विद्यापीठात जगणे शिकलो
विद्यापीठाचा परिसर म्हणजे आपले घर आहे. इथली प्रत्येक गोष्ट हृदयात साठवून ठेवत आम्ही जगत आहोत. ही शिदोरी आजही पुरत आहे. मराठी विभागातील प्राध्यापकांच्या शिकविण्यामुळे आम्ही जगणे शिकलो आणि सहवासामुळे हसणे देखील शिकलो, असेही प्रा. इंद्रजित भालेराव यांनी सांगितले.

Web Title: Strength to survive from farmer father; while Dr. BAMU university fathers like professor supported writing: Indrajit Bhalerao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.