छत्रपती संभाजीनगरचे स्ट्रीट वेंडर पीएम स्वनिधीतून कर्ज घेण्यात राज्यात चौथ्या क्रमांकावर
By मुजीब देवणीकर | Updated: October 12, 2023 12:41 IST2023-10-12T12:41:25+5:302023-10-12T12:41:53+5:30
छत्रपती संभाजीनगर शहरात आतापर्यंत २३ हजार १०७ जणांनी दहा हजारांचे कर्ज घेतले.

छत्रपती संभाजीनगरचे स्ट्रीट वेंडर पीएम स्वनिधीतून कर्ज घेण्यात राज्यात चौथ्या क्रमांकावर
छत्रपती संभाजीनगर : कोरोना संसर्गानंतर रस्त्यावर विविध साहित्य विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले गेले होते. केंद्र सरकारने पीएम स्वनिधी याेजना आणली. या आयोजनाला राज्यात सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ३ लाख ६५ हजार ३४२ स्ट्रीट वेंडरला १० ते ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रत्येकी कर्ज मिळाले. राज्यात जालना महापालिका कर्ज मंजूर करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका चौथ्या क्रमांकावर आहे.
२०२१ मध्ये पीएस स्वनिधीला सुरुवात झाली. पालेभाज्या, फळ, हातगाडीवर विविध साहित्य विक्री करणाऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. अर्ज भरण्यासाठी महापालिकेत अक्षरश: रांगा लागत होत्या. पहिल्याच वर्षी मोठ्या प्रमाणात स्ट्रीट वेंडरबांधवांनी कर्ज घेतले. या कर्जाची परतफेड वेळेवर केल्यास त्यांना ७ टक्के कॅशबॅक अनुदान आहे. त्यांनी डिजिटल व्यवहार केले असतील तर १२०० रुपये पुन्हा कॅशबॅक दिले जातात. छत्रपती संभाजीनगर शहरात आतापर्यंत २३ हजार १०७ जणांनी दहा हजारांचे कर्ज घेतले. ३ हजार ३५८ जणांनी २० हजारांचे तर २३३ व्यापाऱ्यांनी ५० हजारांचेही कर्ज घेतले. शासनाने महापालिकेला दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत ७७ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आल्याची माहिती उपायुक्त मंगेश देवरे यांनी दिली. शहरी भागात ३६ कोटींचे कर्ज मंजूर केले असून, त्यातील २८ कोटी प्रत्यक्षात अर्जदारांच्या खात्यात जमासुद्धा झाले. शहरात लाभार्थ्यांची संख्या २२ हजार ७२७ आहे.
परतफेड चांगली
पहिल्यांदा दहा हजार कर्ज घेतल्यानंतर मिळणारे फायदे हळूहळू व्यापाऱ्यांना कळू लागले. प्रामाणिकपणे दहा हजारांचे कर्ज फेडून २० हजारांसाठी पात्र होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या कर्जामुळे अनेक जणांची आर्थिक स्थिती, व्यवसाय पूर्वीपेक्षा अधिक चांगला झाला आहे.
मंगेश देवरे, उपायुक्त, मनपा.
टॉप टेन महापालिका :
मनपा- उद्दिष्टाची टक्केवारी
जालना- १०३.५० %
इचलकरंजी- ७९.०१ %
सोलापूर- ७८.३०%
छ. संभाजीनगर - ७७.०८ %
नाशिक- ७५.२० %
चंद्रपूर- ७३.९९ %
नागपूर- ६८.२९%
मालेगाव- ६७.९२ %
परभणी- ६६.९७ %
कोल्हापूर ६६.३६%