मोकाट कुत्रा पिसाळला; सिडको एन-७ परिसरात तोडले १४ जणांचे लचके
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 19:43 IST2025-08-18T19:43:21+5:302025-08-18T19:43:56+5:30
मनपा पथकाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

मोकाट कुत्रा पिसाळला; सिडको एन-७ परिसरात तोडले १४ जणांचे लचके
छत्रपती संभाजीनगर : एन-७ सिडको, मुकुल मंदिर शाळा परिसर, सिडको पोलिस स्टेशन परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास १४ जणांचे लचके तोडल्याची घटना रविवारी दुपारी ४ ते सायंकाळी ७:३० वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. या मोकाट कुत्र्याला कोंडण्यासाठी मनपाच्या पथकाशी संपर्क साधल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या मोकाट कुत्र्याच्या हल्ल्याचा एक व्हिडीओही समाेर आला. सायंकाळी ७:३० वाजेचा हा व्हिडीओ आहे. दोन तरुण एका गल्लीत उभे आहेत व ज्येष्ठ पायी जात आहेत, समोरून आलेल्या मोकाट कुत्र्याने अचानक या ज्येष्ठ नागरिकावर हल्ला केला, असे यात दिसते. ज्येष्ठ नागरिकाच्या चेहऱ्यावर आणि हाताचे मोकाट कुत्रा लचके तोडतो. यावेळी अन्य नागरिक धाव घेतात. त्यामुळे मोकाट कुत्र्यापासून ज्येष्ठ नागरिकाची सुटका होते. अशाच प्रकारे परिसरातील अन्य लोकांवर या कुत्र्याने हल्ला केल्याचे नागरिकांनी सांगितले. काही घाटी रुग्णालयात, तर काहींनी परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली.
घाटीत यांच्यावर उपचार
घाटी रुग्णालयात रात्री ९ वाजेपर्यंत अमोल भूल, रुद्र शेळके, शिवाजी राठोड, शुभम घुसे, ज्ञानेश्वर बेंद्रे, प्रवीण हिवाळे, हिम्मत सोमखाल हे उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली.
...म्हणे आज रविवार, सकाळी येतो
एन-७, सिडको, मुकुल मंदिर शाळा परिसर, सिडको पोलिस स्टेशन परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास १४ जणांना चावा घेतला. डॉग व्हॅनला तक्रार केली असता आज रविवार आहे, आमच्याकडे कर्मचारी नसल्यामुळे आम्ही येऊ शकत नाही, सकाळी येतो, असे सांगण्यात आले; परंतु मुकुल मंदिर शाळा ही सकाळी ७ वाजता भरते व शाळेमध्ये साडेतीनशे ते चारशे विद्यार्थी आहेत. जर त्या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले नाही, तर खूप मोठा धोका संभवतो. मी स्वतः मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांना फोन केला; परंतु त्यांनी फोन घेतला नाही. त्यांना मेसेज केला आहे. मनपाच्या श्वान पथकाच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही फोन केला; पण त्यांनी फोन घेतला नाही आणि माझा नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला.
- रवींद्र तांगडे