दुचाकी चोरी करून पुन्हा चोरीसाठी तिथेच आले; चाणाक्ष पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 16:45 IST2022-02-17T16:45:03+5:302022-02-17T16:45:17+5:30
जालन्याच्या दोन चोरट्यांना अटक, त्यांच्याकडून चोरीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत

दुचाकी चोरी करून पुन्हा चोरीसाठी तिथेच आले; चाणाक्ष पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले
औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील दोन दुचाकी चोरांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. नितीन सुरेश जगताप (२१) आणि अनिल बबन इंगळे (२१, रा. त्रिंबकनगर, चंदनझिरा, जालना) अशी चोरांची नावे आहेत. त्यांनी शहराच्या विविध भागांसह राहाता येथून चोरलेल्या ४ लाख ९० हजार किमतीच्या ९ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
प्रोझोन मॉलसमोरील रस्त्यावरून ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दुचाकी चोरीला गेली होती. त्यावरून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तेव्हा जगताप आणि इंगळे हे दोघेही फुटेजमध्ये कैद झाले होते. त्यांचा शोध सुरू असतानाच जमादार दयानंद ओहळ यांना दोघे प्रोझोन मॉलजवळ फिरताना आढळून आले. एकदा त्या ठिकाणाहून एकदा चोरी केल्यानंतर पुन्हा एकदा चोरीच्या उद्देशाने आल्यामुळे ओहळ यांनी लगेचच पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्याशी संपर्क साधला.
त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे, उपनिरीक्षक शिंदे, सहायक फौजदार सीताराम केदारे, पोलीस नाईक शाहेद पटेल, संदीप जमधडे, शिपाई नाना घोडके, नितेश सुंदर्डे, विक्रांत पवार आणि अविनाश दाभाडे यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना पकडले. त्यांची कसून चौकशी केल्यावर सिटी चौक, जिन्सी, क्रांती चौक, एमआयडीसी सिडको, पुंडलिकनगर, भोकरदन, नगरमधील राहाता येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या नऊ दुचाकी पोलिसांनी दोघांकडून जप्त केल्या असल्याची माहिती निरीक्षक पोटे दिली.