नशेखोरांसाठी आणलेला कफ सिरपचा साठा रिक्षातून वाहतूक करताना जप्त
By बापू सोळुंके | Updated: April 29, 2023 20:16 IST2023-04-29T20:15:24+5:302023-04-29T20:16:06+5:30
नशेखोरांना विक्री करण्यासाठी गुंगीकारक कफ सिरपचा साठा घेऊन एका रिक्षाने दोन जण येत असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती

नशेखोरांसाठी आणलेला कफ सिरपचा साठा रिक्षातून वाहतूक करताना जप्त
छत्रपती संभाजीनगर : खोकल्याच्या गुंगीकारक औषधाचा साठा नशेखोरांना विक्री करण्यासाठी रिक्षातून घेऊन जाणाऱ्या दोन रिक्षाचालकांना अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून पकडले.
या कारवाईत २ लाख ९४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई २८ एप्रिल रोजी जालाननगर येथे करण्यात आली. सोहेल सय्यद महेमूद (रा. रेल्वे स्टेशन परिसर) आणि शाहजाद मंजूर शेख (रा. भारतनगर, बिडकीन) अशी अटकेतील रिक्षाचालकांची नावे आहेत. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, नशेखोरांना विक्री करण्यासाठी गुंगीकारक कफ सिरपचा साठा घेऊन एका रिक्षाने दोन जण येत असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली.
पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, औषध निरीक्षक जि. द. जाधव, पोलिस कर्मचारी धर्मराज गायकवाड, मंगेश हरणे, राजाराम वाघ, सुनील पवार, नितीन देशमुख, महिला हवालदार प्राजक्ता वाघमारे, चालक दत्ता दुभळकर यांच्या पथकाने जालाननगर परिसरात सापळा रचून संशयित रिक्षा पकडली. तेव्हा रिक्षात कफ सिरप औषधाच्या ९२ बाटल्या होत्या. दोन्ही आरोपी रिक्षात होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी ही औषधे नशेखोरांनाच विक्री करण्यासाठी नेत असल्याचे कबूल केले. या प्रकरणी त्यांच्याविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.