उंचावरील हॉटेलमध्ये थांबल्याने जीव वाचला, सिक्कीममध्ये पुरात अडकलेले पर्यटक सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 13:42 IST2023-10-09T13:41:54+5:302023-10-09T13:42:47+5:30
नातेवाईकांसोबत झाला संपर्क;सिक्कीम प्रशासनाने हेलिकॉप्टरने एअरपोर्टला सोडले

उंचावरील हॉटेलमध्ये थांबल्याने जीव वाचला, सिक्कीममध्ये पुरात अडकलेले पर्यटक सुरक्षित
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: सिक्कीममध्ये पर्यटनासाठी गेलेले सिल्लोडमधील दोन कुटुंबातील ८ सदस्य पुरामुळे अडकले होते. त्यांचा अखेर संपर्क झाला असून ते लाचुंग येथील हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याने नातेवाईक आणि महाराष्ट्र प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, सिक्कीम प्रशासनाने त्यांना हेलिकॉप्टरने लाचुंग येथून एअरपोर्टला सोडल्याची माहिती पर्यटकांचे नातेवाईक नंदकिशोर सहारे यांनी लोकमतला दिली.
सिल्लोड शहरातील सहारे आणि जैन या दोन कुटुंबातील आठ सदस्य पर्यटनासाठी सिक्कीमला गेले होते. कुणाल सुरेश सहारे, पत्नी राजश्री त्यांचा मुलगा सर्वांष,मुलगी साईशा तर स्नेहेश कांतीलाल जैन (ओस्तवाल), पत्नी शितल त्यांची मुलगी मोक्षा, मुलगा सिद्धांत ही लाचुंग येथील हॉटेल यशश्री येथे थांबले होते. अचानक अतिवृष्टी झाल्याने तिस्ता नदीच्या खोऱ्यात महापूर आला. यामुळे दोन्ही कुटुंबाचा नतेवाईकांसोबतचा संपर्क ३ ऑक्टोबरपासून तुटला होता. याची माहिती मिळताच अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, खासदार रावसाहेब दानवे यांनी सिक्कीम सरकार व तेथील कमिशनर यांच्याशी संपर्क केला. मात्र तेथील पूर परिस्थिती व वातावरण खराब असल्याने कुणाशी संपर्क झाला नसल्याचे प्रशासनाने शनिवारी कळवले होते. दरम्यान, रविवारी रात्री कमिशनर व पोलीस प्रशासनाने शोध घेतला असता सर्वजण हॉटेलमध्ये सुरक्षित आढळले. त्यानंतर आज सकाळी सिक्कीम प्रशासनाने हेलिकॉप्टरने एअरपोर्टला आणून सोडले. दोन दिवसात सर्वजण छत्रपती संभाजी नगरला पोहचतील अशी माहिती नंदकिशोर सहारे यांनी दिली.
उंचावरील हॉटेलमध्ये थांबल्याने अनर्थ टळला
पर्यटक सुदैवाने ज्या नदीला पूर आला होता त्याच्या विरुद्ध दिशेला उंचावर असलेल्या हॉटेलमध्ये थांबले होते. यामुळे दैव बलवत्तर म्हणून ते वाचले.