छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात फेब्रुवारी महिन्यात मोठा गाजावाजा करून किमोथेरपी सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. परंतु, याठिकाणी किमोथेरपी देण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी-कर्मचारीच मिळाले नाहीत. याशिवाय किमोथेरपीची औषधीही मिळाली नाही. परिणामी, लोकार्पणानंतरही हे सेंटर कुलूपबंदच आहे.
राज्यभरातील विविध ठिकाणी कर्करोग मोबाइल व्हॅन, १०२ रुग्णवाहिका, सीटी स्कॅन, ‘डे केअर किमोथेरपी सेंटर’ इ. सुविधांचे ९ फेब्रुवारी रोजी ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एकाचवेळी ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. यात छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा रुग्णालयातील ‘डे केअर किमोथेरपी सेंटर’चा समावेश होता. शासकीय कर्करोग रुग्णालय राज्यभरातील कॅन्सर रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. या रुग्णालयावरील किमोथेरपीचा भार काही प्रमाणात कमी करण्याच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालयातील किमोथेरपी सेंटर महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु, केवळ लोकार्पणापुरतेच हे सेंटर राहिले. लोकार्पणाला ४ महिने उलटूनही औषधी, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांअभावी याठिकाणी किमोथेरपीला सुरुवात झालेली नाही.
दहा खाटा धूळ खातजिल्हा सामान्य रुग्णालयात दहा खाटांचे ‘डे केअर किमोथेरपी सेंटर’ साकारण्यात आले आहे. याठिकाणी दररोज दहा कॅन्सर रुग्णांना मोफत किमोथेरपी घेता येईल, असे सांगण्यात आले होते.
किमोथेरपी म्हणजे काय?किमोथेरपी हा एक वैद्यकीय उपचार आहे, जो कर्करोग बरा करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या औषधांचा वापर करून केला जातो. ही औषधे शरीरातील वेगाने वाढणाऱ्या कर्करोग पेशींवर प्रभाव टाकून त्यांना नष्ट करतात. कर्करोग पूर्णपणे नष्ट करणे, कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवणे किंवा मंदावणे, इतर अवयवांमध्ये कर्करोग पसरू न देणे, वेदना कमी करणे किंवा लक्षणे नियंत्रित ठेवणे ही किमोथेरपीमागील उद्दिष्ट असतात.
लवकरच सेंटर सुरू होईलवैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा रिक्त आहे. चार पैकी दोन परिचारिकांची पदे भरलेली आहेत. परिचारिकांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल. औषधींचीही मागणी केलेली असून, लवकरच किमोथेरपी सेंटर सुरू होईल.- डाॅ. जितेंद्र डोंगरे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक