गोदावरी नदीतून जलवाहतूक सुरू करणार, डिसेंबरमध्ये प्रत्यक्षात कामास होणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 23:39 IST2018-08-04T23:38:07+5:302018-08-04T23:39:42+5:30
नदीजोड प्रकल्पातून गोदावरी नदीला भरपूर पाणी राहणार आहे.

गोदावरी नदीतून जलवाहतूक सुरू करणार, डिसेंबरमध्ये प्रत्यक्षात कामास होणार सुरुवात
औरंगाबाद : नदीजोड प्रकल्पातून गोदावरी नदीला भरपूर पाणी राहणार आहे. नाशिक ते नांदेड आणि पुढे काकिनाडापर्यंत जलवाहतुकीचा मार्ग तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. डिसेंबरपर्यंत प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला नदीजोड प्रकल्प असून, याद्वारे दमनगंगेचे पाणी गोदावरीकडे वळवण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे जायकवाडी धरणात जलसाठा वाढणार आहे. रस्ते, रेल्वे आणि विमानमार्गाचा खर्च अधिक येतो, तुलनेने जलवाहतूक ही सर्वात स्वस्त व किफायतशीर असल्याचे गडकरी म्हणाले. त्यामुळे नाशिक ते नांदेड आणि पुढे काकिनाडापर्यंत जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यादृष्टीने तयारी केली जात असून, या प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. आराखडा सादर होताच डिसेंबरपर्यंत याचे प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. राज्यात जलवाहतुकीसाठी पोर्ट उभारणी करण्यास जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आॅफ इंडिया पुढाकार घेणार असून, नांदेड येथे पोर्ट उभारले जाणार आहे. जलवाहतुकीमुळे मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचा दावाही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केला. अकोला आणि बुलडाणा या दोन्ही जिल्ह्यांनी नदीजोड प्रकल्पात उल्लेखनीय काम केले आहे. हाच कित्ता मराठवाड्यात गिरविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकºयांनी माती दिल्यास त्यांना मोफत शेततळी बांधून दिली जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले.
दहा लाख कोटींचा कामे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त
देशभरात गत चार वर्षांत रस्ते बांधणीवर दहा लाख कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. यात झीरो टॉलरन्स करप्शन आणि पारदर्शकता ठेवण्यात आली. रस्ते काँक्रिटीकरणावर भर असून, उत्कृष्ट दर्जाच्या कामांमुळे किमान आगामी शंभर वर्षे या रस्त्यांवर खड्डे पडणार नसल्याचे गडकरी म्हणाले.
..............................
मनमाड-इंदूर मार्गाचे काम लवकरच
मनमाड ते इंदूर रेल्वे मार्गाचे कामही आगामी तीन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. या मार्गामुळे दिल्ली ते चेन्नई, बंगळुरू यादरम्यानचे अंतर कमी होणार असल्याचे गडकरी म्हणाले.