हरिण- मोरांकडून कोवळे पीक फस्त

By Admin | Updated: July 27, 2014 01:13 IST2014-07-26T23:58:12+5:302014-07-27T01:13:36+5:30

औसा : तालुक्यात पावसाअभावी पेरण्या तब्बल महिनाभर उशिराने झाल्या़ परिणामी सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले़ त्यात ५० टक्के क्षेत्रावर बियाणे उगवले नाही़

Stag-Peacock | हरिण- मोरांकडून कोवळे पीक फस्त

हरिण- मोरांकडून कोवळे पीक फस्त

औसा : तालुक्यात पावसाअभावी पेरण्या तब्बल महिनाभर उशिराने झाल्या़ परिणामी सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले़ त्यात ५० टक्के क्षेत्रावर बियाणे उगवले नाही़ जे बियाणे उगवले ते आता हरिण आणि मोर फस्त करीत आहेत़ वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाले आहेत़
औसा तालुका हा पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे़ तालुक्यात सिंचन क्षेत्र ही अगदी कमी आहे़ गेल्या चार- पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे बागायती क्षेत्र मोडकळीस आले आहे़यंदाच्या उन्हाळ्याच्या प्रारंभी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला़ त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला़ त्यातच खरीप हंगामात काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनची उगवण झाली नाही़ ज्या शेतकऱ्यांचे पीक उगवले आहे़ त्यावर हरिण, मोर ताव मारीत आहेत़ त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे़ पेरण्या झाल्यानंतर मोठा पाऊसच न झाल्यामुळे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात उगवण झालेल्या कोवळ्या पिकांची नासधूस करीत आहेत़
गेल्या काही वर्षांत तालुक्यात हरणांची संख्या वाढली आहे़ तालुक्यात जवळपास आठ ते दहा हजार हरणांची संख्या आहे़ हरिण हा माळरानावर राहणारा प्राणी आहे़ पण आता मात्र कुठेही हरणांचे कळप दिसू लागले आहेत़ एका कळपात २० ते २५ हरिण असतात़ एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात हरिण घुसले की त्याचे उगवलेले सोयाबीन फस्त करीत आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना उगवलेल्या सोयाबीनची राखण करावी लागत आहे़ तालुक्यातील नागरसोगा, दापेगाव, तुंगी, चिंचोली, भादा, हासेगाव, गोद्री, लामजना, उत्का, दावतपूर या गावांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत़(वार्ताहर)
दिवसरात्र पिकांची राखण़़़
हरणांनी एकदा सोयाबीनचा उगवण झालेला शेंडा खाल्ला की पुन्हा फुटत नाही़ त्यामुळे रात्रं-दिवस राखण करावी लागत असल्याचे नागनाथ शिंदे, जगदीश मिश्रा, संजय सूर्यवंशी, हणमंत काकडे, दत्तू पांचाळ या शेतकऱ्यांनी सांगून दिवस-रात्र राखण करावी लागत असल्याचे म्हणाले़

Web Title: Stag-Peacock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.