एसटी महामंडळाचा औरंगाबाद विभाग ‘खिळखिळ्या’ बसपासून मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 18:28 IST2018-11-15T18:24:26+5:302018-11-15T18:28:47+5:30
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील म्हणजे जिल्ह्यातील बसगाड्या खिळखिळ्यामुक्त झाल्या आहेत.

एसटी महामंडळाचा औरंगाबाद विभाग ‘खिळखिळ्या’ बसपासून मुक्त
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील म्हणजे जिल्ह्यातील बसगाड्या खिळखिळ्यामुक्त झाल्या आहेत. खडखड करणाऱ्या बॉडीची एकही बस राहिली नसून प्रवासी आणि चालकांसाठी बस आरामदायक झाल्याचा दावा विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी केला.
अनेक वर्षांपासून धावणाऱ्या एसटी बस खिळखिळ्या झाल्याने प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत होत्या. एसटीचा प्रवास प्रवाशांसाठी खडतर ठरत होता; परंतु गेल्या दोन वर्षांत एसटी महामंडळाने कात टाकली आहे. खाजगी बसच्या बरोबरीने टक्कर देत सेवा देत आहे. त्यासाठी शिवशाहीसारख्या नव्या बसगाड्या दाखल करण्यासह बसच्या पुनर्बांधणीत बदल केला आहे.
एसटी महामंडळाच्या बसच्या तुटलेल्या खिडक्या, फाटके सीट व पावसाळ्याच्या दिवसात छतामधून टपकणारे पावसाचे पाणी आणि प्रवाशांची कंबरडे मोडण्यासाठी, प्रवाशांची हाडे खिळखिळी करणारे अशी प्रतिमा दूर केली जात आहे. औरंगाबाद विभागात ६१६ बसगाड्यांचा ताफा आहे. प्रत्येक बसची वेळीच देखभाल-दुरुस्ती होईल, यासाठी विभागाने प्राधान्याने लक्ष केंद्रित केले. त्यामुळे बसच्या अवस्थेत सुधारणा झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामध्ये आजघडीला विभागात एकाही बसची बॉडी खराब नाही. त्यामुळे प्रवासी आणि चालकांना प्रवासात कोणताही त्रास जाणवत नसल्याचे प्रशांत भुसारी यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
खिळखिळी बस बनली स्टील बॉडीची
विभागातील खिळखिळ्या आणि भंगार बसचे रूपांतर स्टील बॉडीच्या बसमध्ये करण्यात आले आहे. अशाप्रकारे गेल्या काही दिवसांत विभागातील २१ लाल बसने आता स्टील बॉडीच्या बसचा आकार घेतला आहे.
असा आहे ताफा
विभागात ४१० लाल बस, ५८ एशियाड, २१ स्टील बॉडीच्या बस, ५४ शिवशाही, ८ शिवनेरी, १४ मिडी बस, शीतल बस ५ आणि ४६ शहर बस असा ६१६ बसचा ताफा आहे.
रस्त्यांनी बसची नादुरुस्ती
बस खिळखिळी राहणार नाही, यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरूआहेत; परंतु प्रवासी वाहतूक करताना ग्रामीण भागासह अनेक मार्गांवरील रस्त्यांची दुरवस्था आहे. या रस्त्यांमुळे बसची बांधणी खिळखिळी होते, असेही महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.