बारावीनंतर 10वी बोर्ड परिक्षेतही बीड जिल्हा विभागात अव्वल, मुलींनी मारली बाजी

By बापू सोळुंके | Updated: May 13, 2025 16:25 IST2025-05-13T16:25:17+5:302025-05-13T16:25:38+5:30

गतवर्षीच्या तुलनेत विभागाचा २.३७ टक्केंनी निकाल घसरला

SSC Result 2025: Beed topped the 10th board exam in division | बारावीनंतर 10वी बोर्ड परिक्षेतही बीड जिल्हा विभागात अव्वल, मुलींनी मारली बाजी

बारावीनंतर 10वी बोर्ड परिक्षेतही बीड जिल्हा विभागात अव्वल, मुलींनी मारली बाजी

छत्रपती संभाजीनगर: विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल आज (१३ मे) रोजी जाहिर झाला. विभागात बारावीपाठोपाठ दहावी बोर्ड परिक्षेतही बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अव्वल बाजी मारली आहे. तर छत्रपती संभाजीनगर दुसऱ्या स्थानी राहिले आहे. विभागात मुलांपेक्षा आपणच हुशार असल्याचे मुलींनी दाखवून दिले आहे. यंदा मात्र गतवर्षीच्या तुलनेत या निकालाची घोषणा विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे आणि सचीव डॉ.वैशाली जामदार यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दुपारी केली.

विभागाच्या सचीव जामदार यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर विभागात दहावी बोर्ड परिक्षेसाठी १लाख ८५ हजार ४०७ विद्यार्थ्यांनी परिक्षा फॉर्म भरले होते. यापैकी १लाख ८३ हजार ९५७ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. एकूण विद्यार्थ्यांपैकी १लाख७०हजार ७५०विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९२.८२टक्के आहे. गतवर्षी ९५.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल २.३७ टक्क्यांनी घसरला आहे. 

कॉपीमुक्त अभियानाची उत्तम अंमलबजावणी झाल्याने निकाल घसरल्याचे त्यांनी सांगितले. यंदा छत्रपती संभाजीगर जिल्ह्यातील ६६हजार ६२६विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यापैकी ६२हजार ३६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याची उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.६०टक्के आहे. बीड जिल्ह्यातील ४१हजार५४१विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यापैकी ४० हजार ९७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

बीड जिल्ह्यातील ९६.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परभणी जिल्ह्यातील २८हजार ५९२ विद्यार्थ्यांनी परिक्षेला उपस्थिती नोंदविली होती. यापैकी २५ हजार५१६विद्यार्थी पास झाले आहेत. परभणीच्या पास विद्यार्थ्यांची टक्केवारी ८९.२४ आहे. जालना जिल्ह्यातील ३१हजार ५८५ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यापैकी २८हजार ८८३ विद्यार्थी पास झाले. या विद्यार्थ्यांची टक्केवारी ८९.०७टक्के आहे. हिंगोली जिल्ह्यातील १५हजार६१३ विद्यार्थ्यांनी परिक्षेला उपस्थिती नोंदविली होती. यापैकी १३हजार ९०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हिंगोलीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८९.८२ टक्के आहे.

मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेच प्रमाण ४.८ टक्केंनी अधिक
छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत असलेल्या पाच जिल्ह्यांतर्गत १लाख२हजार ७२७ मुले परिक्षेला बसले होते. यापैकी ९३हजार १७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९०.७० टक्के आहे. दुसरीकडे ८१हजार२३० मुलींनी परिक्षेला हजेरी नोंदविली होती. यापैकी ७७हजार ५७६ मुलीं उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ४.८ टक्क्यांनी अधिक असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष साबळे यांनी सांगितले.

Web Title: SSC Result 2025: Beed topped the 10th board exam in division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.