विहिरीत विष टाकल्याने पाचोडमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:36 IST2018-12-12T00:35:59+5:302018-12-12T00:36:14+5:30
पाचोड शिवारातील एका मळ्यातील विहिरीत अज्ञात माथेफिरू व्यक्तीने विषारी औषध टाकल्यामुळे गावात खळबळ उडाली.

विहिरीत विष टाकल्याने पाचोडमध्ये खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोड : पाचोड शिवारातील एका मळ्यातील विहिरीत अज्ञात माथेफिरू व्यक्तीने विषारी औषध टाकल्यामुळे गावात खळबळ उडाली.
पाचोड येथील भगवान जायकर यांच्या शेतात ही घटना घडली. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी पाचोड गावात फिल्टर पाण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. हे फिल्टरचे पाणी पाचोड गावासह परिसरातील विविध गावांत जाते.
सकाळी जायकर हे मळ्यात मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरींच्या आजूबाजूला विषारी औषधांचा उग्र वास येत
होता. कोणीतरी विहिरीतील पाण्यात विषारी औषध टाकले असावे म्हणून त्यांनी मोटार सुरू केली नाही. त्यांनी जावाई राहूल नारळे यांना माहिती दिली. नारळे यांनी पाचोड पोलीस ठाण्यात माहिती दिली. यानंतर सपोनि. अभिजित मोरे, सहायक फौजदार सुधाकर मोहिते, जमादार संजय चव्हाण यांनी तातडीने पाहणी केली व विहिरीतील पाणीपुरवठा बंद केला. जायकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा लवकरच तपास लावण्यात येईल, असे सपोनि. अभिजित मोरे यांनी सांगितले.