खर्च जरा जपूनच!
By Admin | Updated: October 7, 2014 00:16 IST2014-10-06T23:55:14+5:302014-10-07T00:16:53+5:30
बीड : लोकसभा पोटनिवडणुकीत प्रमुख उमेदवारांसह अपक्षांनीही खर्चाच्या बाबतीत ‘जरा जपूनच’ असे धोरण स्वीकारले आहे़ आतापर्र्यंत भाजपाच्या प्रीतम मुंडे यांनी केवळ ७०

खर्च जरा जपूनच!
बीड : लोकसभा पोटनिवडणुकीत प्रमुख उमेदवारांसह अपक्षांनीही खर्चाच्या बाबतीत ‘जरा जपूनच’ असे धोरण स्वीकारले आहे़ आतापर्र्यंत भाजपाच्या प्रीतम मुंडे यांनी केवळ ७० हजार रुपये खर्च केले़ काँग्रेसच्या अशोक पाटलांनीही हात सैल सोडलेला नाही़ त्यांच्या खिशाला केवळ २७ हजारांची झळ पोहोचली आहे़
गोपीनाथराव मुंडे यांच्या मृत्यूने रिक्त झालेल्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही़ सात अपक्ष व राजकीय पक्षांचे पाच उमेदवार अशी डझनभर उमेदवारांची ही लढाई आहे़ सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत डॉ़ प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी काँगे्रसचे उमेदवार अशोक पाटील यांना ‘हात’ दाखविण्याची तयारी केली आहे़
दुसरीकडे राष्ट्रवादीने माघार घेतली तरी कॉंग्रेसने मात्र संधी सोडलेली नाही़ दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील सर्वच्या सर्व १२ उमेदवारांनी ४ आॅक्टोबरपर्यंत केवळ दोन लाख ४० हजार ५४३ रुपये उडवले आहेत़ यात एकट्या प्रीतम मुंडे यांचा खर्च ७१ हजार ७३ रुपये इतका आहे तर काँग्रेसचे अशोक पाटील यांनी केवळ २७ हजार ४५५ रुपये इतका खर्च केला आहे़ पाठोपाठ अपक्ष मुकर्रमजान पठाण यांनी २६ हजार ५१५ रुपये इतका खर्च केला़
अपक्ष मनीनाथ तिवारींचे २६ हजार ३३० रुपये खर्च झाले़ अपक्ष तुकाराम उगले यांनी २५ हजार ६४० तर कालीदास आपेट यांचा २५ हजार ५०० रुपये इतका खर्च झाला़ पाठोपाठ तेजस घुमरेंचा २५ हजार २५० रुपये इतका खर्च झाला आहे़ राहुल कांबळेंनी १२ हजार ७८० रुपये खर्च केला आहे़
दोन राजकीय पक्षांसह दोन अपक्षांच्या खर्चाचा कुठलाच ताळमेळ नाही़ (प्रतिनिधी)
तीन दिवसानंतर एकदा निवडणूक विभागात खर्चातील हिशेब दाखल करणे अनिवार्य आहे़ मात्र, चार उमेदवार असे आहेत, ज्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर खर्चाचा हिशेबच दिला नाही़ त्यामुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी त्या चारही उमेदवारांना नोटीस पाठवली आहे़ बसपाच्या उमेदवार द्वारका पिराजी कांबळे, रामा वाव्हळे, अपक्ष उमेदवार सुशीला मोराळे, अविनाश वानखडे यांचा समावेश आहे, अशी माहिती निवडणूक खर्च विभागातील अधिकाऱ्यांनी दिली़