शोभायात्रेतून महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन
By Admin | Updated: September 28, 2014 00:41 IST2014-09-28T00:39:29+5:302014-09-28T00:41:29+5:30
शिवाजी राजूरकर, नवीन नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व इंदिरा कॉलेज आॅफ फार्मसीच्या वतीने आयोजित ‘सहयोग-२०१४’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवास प्रारंभ झाला़

शोभायात्रेतून महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन
शिवाजी राजूरकर, नवीन नांदेड
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व इंदिरा कॉलेज आॅफ फार्मसीच्या वतीने आयोजित ‘सहयोग-२०१४’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवास शनिवारपासून प्रारंभ झाला़ पहिल्या दिवशी विद्यार्थी कलावंतांनी काढलेल्या शोभायात्रेचे उद्घाटन कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून झाले़ या शोभायात्रेतून महाराष्ट्राच्या विविध लोककलेचे दर्शन झाले़ शिवाय मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी देखाव्याच्या माध्यमातून मतदार जागृतीचा संदेशही देण्यात आला़
यंदाचा आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव सहयोग सेवाभावी संस्थेच्या परिसरात होत आहे़ या महोत्सवासाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड या चार जिल्ह्यांतील विद्यार्थी-कलावंत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत़ उद्घाटनप्रसंगी कुलसचिव भगवंत पाटील, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ़ दीपक पानसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ़ गणेश शिंदे, प्राचार्य विश्वनाथ भरकड, प्रा़ तुकाराम इंगोले, डॉ़ विवेक इनामदार, प्रा़राजशेखर कुंबार, प्रा़नदीम खान आदी उपस्थित होते़
शनिवारी सकाळी काढलेल्या शोभायात्रेत गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयाच्या संघाने वारकरी संप्रदायावर आधारित संत जनाबाई व संत विठोबा यांच्या देखाव्याचे सादरीकरण केले़ विष्णूपुरी येथील इंदिरा कॉलेज आॅफ फार्मसीच्या संघाने लोककला प्रकारातील गोंधळ तर भोकर येथील कै़दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या संघाने संत गाडगे महाराज यांच्या संकल्पनेतील स्वच्छता अभियानावर आधारित दृष्यासह मतदार जनजागृती केली़ पालम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या संघाने वाघ्या-मुरळी व धनगर नृत्य सादरीकरणासोबतच महाराष्ट्रातील सर्व समाजसुधारकांचे दर्शन घडविले़ कंधार येथील शिवाजी कॉलेजच्या संघाने पोतराज, वासुदेव व वाघ्या-मुरळी आदी लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले़
किनवट येथील बळीराम पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी लोकनृत्य सादर केले़ लातूर येथील बसवेश्वर फार्मसी कॉलेजच्या संघाने धनगर नृत्य सादर केले़ सोनपेठ येथील राजीव गांधी वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ हा कला प्रकार सादर केला़ नांदेड येथील एमजीएमच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती, गोहत्या विरोधी अभियान राबविण्यासोबतच प्लास्टीकचा वापर टाळा, प्रदूषणाला आळा घाला हा संदेश दिला़ वाघ्या मुरळी हे लोकनृत्य सादर करत हम सब एक है़़़ असा नारा देवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले़
स्वारातीम विद्यापीठ उपकेंद्र लातूर येथील संघाने सर्वधर्म समभावनेचा संदेश देत मतदान करू या, भारत बनवू या़़़ अशा घोषणा देत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले़
सेलू येथील ज्ञानसाधना महाविद्यालयातील लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यासोबत आधुनिक पिढी आपली संस्कृती विसरून पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळत असल्याचा सजीव देखावा सादर केला़ सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या संघाने मतदानदिनी मतदान करण्यासाठी मिळालेल्या सुटीचा उपयोग हॉली डे साजरा केल्याबद्दल नाराजी दर्शविली़ कोळी, पोतराज, आदिवासी, धनगर गोंधळी आदी नृत्य कलाप्रकारासोबत स्वच्छता अभियान, पाणी आडवा पाणी जिरवा, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश शोभायात्रेतून दिला़