अतिक्रमण हटावसाठी स्पेशल टास्क फोर्स
By Admin | Updated: April 7, 2016 01:05 IST2016-04-07T01:03:41+5:302016-04-07T01:05:21+5:30
औरंगाबाद : शहरातील अनेक नाल्यांमध्ये २०० पेक्षा अधिक लहान मोठी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळायला तयार नाही.

अतिक्रमण हटावसाठी स्पेशल टास्क फोर्स
औरंगाबाद : शहरातील अनेक नाल्यांमध्ये २०० पेक्षा अधिक लहान मोठी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळायला तयार नाही. दरवर्षी पावसाळ्यात मनपाला मोठा त्रास सहन करावा लागतो. मनपातर्फे भूमिगत गटार योजनेचे कामही अनेक नाल्यांमधील अतिक्रमणांमुळे थांबले आहे. बुधवारी मनपा आयुक्तांनी झांबड इस्टेट ते भानुदासनगरपर्यंतच्या नाल्यांची पाहणी केली. नाल्यातील अतिक्रमणे पाहून आयुक्तांनी स्पेशल टास्क फोर्स तयार करून अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले.
मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, महापौर त्र्यंबक तुपे यांनी झांबड इस्टेट ते भानुदासनगर या अडीच किलोमीटर लांब नाल्याची पाहणी केली. या नाल्यातून मनपाला भूमिगत गटार योजनेचे पाईप टाकायचे आहेत. मागील दोन महिन्यांपासून काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. नाल्यातील अतिक्रमणे हटविल्याशिवाय पाईप टाकणे अशक्यप्राय आहे. नाल्यात १५ ते २० जणांनी पक्के बांधकाम केले आहे. शहरातील इतर नाल्यांवरही अशाच पद्धतीची अतिक्रमणे आहेत. या अतिक्रमणांची संख्या जवळपास २०० पेक्षा जास्त आहे. उपायुक्त रवींद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली स्पेशल टास्क फोर्स नेमण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. या पथकाने नाल्यातील अतिक्रमणे त्वरित काढावीत, असेही बकोरिया यांनी आदेशित केले. दोन महिन्यांनंतर पावसाळा सुरू होणार असून, त्यापूर्वी नाल्यातील गाळ काढण्यात यावा, तसेच अतिक्रमणे हटवून काम करण्यात यावे, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक नितीन साळवी, नगरसेविका अंकिता विधाते, उपायुक्त रवींद्र निकम, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अफसर सिद्दीकी, उपअभियंता वसंत निकम यांच्यासह खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.