औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक बरखास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 17:44 IST2020-08-10T17:35:46+5:302020-08-10T17:44:03+5:30
पोलीस अधीक्षकांनी अचानक सदरील पथक बरखास्त केल्यामुळे पोलीस दलात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक बरखास्त
औरंगाबाद : ग्रामीण भागात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी नेमलेले विशेष पथक बरखास्त करण्यात आले आहे. पथकप्रमुख उपनिरीक्षक विवेक जाधव यांच्याकडे आता पीआरओ शाखा आणि सायबर शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. हा निर्णय पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी घेतला असून, शनिवारी पथक बरखास्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दीड वर्षापूर्वी उपनिरीक्षक विवेक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही जोरदार कारवाई करीत असताना हे पथक नियुक्त करण्यात आल्याने स्थानिक गुन्हे पथकातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. सदरचे विशेष पथक हे तात्पुरत्या स्वरूपाचे होते. त्यामुळे ते बरखास्त केल्याचे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शनिवारी एका आदेशान्वये कळविले आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी अचानक सदरील पथक बरखास्त केल्यामुळे पोलीस दलात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या पथकात एलसीबीचे विवेक जाधव, व्हीआयपी सुरक्षा विभागातील पोलीस नाईक खामट, मुख्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल त्रिंबक बनसोडे, अभिजित डहाळे, मोटार परिवहन विभागातील रोहिदास पगडे यांचा समावेश होता.
महिन्यापासून कारभार थंड
ग्रामीण पोलीस दलातील सूत्रांच्या माहितीनुसार, विशेष पथकाचा कारभार हा गेल्या महिनाभरापासून थंड होता. पथकप्रमुख विवेक जाधव यांना ज्या दिवशी सायबर आणि पीआरओ शाखेत बसविले त्याच दिवशी पथक बरखास्त होणार असल्याची बाब स्पष्ट झाली होती.