पाणी, स्वच्छतेवरुन सभापती कडाडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 00:03 IST2016-05-16T23:58:30+5:302016-05-17T00:03:58+5:30
नांदेड : शहरात नियोजनाअभावी निर्माण झालेली भीषण पाणी परिस्थिती आणि मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या रखडलेल्या कामावर स्थायी समिती सभापती अनुजा तेहरा

पाणी, स्वच्छतेवरुन सभापती कडाडल्या
नांदेड : शहरात नियोजनाअभावी निर्माण झालेली भीषण पाणी परिस्थिती आणि मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या रखडलेल्या कामावर स्थायी समिती सभापती अनुजा तेहरा यांनी सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत प्रशासनास धारेवर धरले़
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी सभापती अनुजा तेहरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या सभेत समिती सदस्य संजय मोरे यांनी शहरात निर्माण झालेल्या पाणीप्रश्नावर प्रशासन काय करीत आहे असा सवाल केला़ तसेच स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर झाल्याचे सांगितले़ महापालिकेची जेसीबी मशीन किरकोळ दुरूस्तीसाठी बंद दाखवून खाजगी जेसीबी घेतल्या जात असल्याचा आरोप मोरे यांनी केला़
या विषयावर सभापती अनुजा तेहरा यांनीही प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजना तोकड्या असल्याचे सांगितले़ एकीकडे स्वच्छतेच्या कामांवर लाखो रूपयांची उधळण करीत असताना प्रत्यक्षात कामे दिसत नाहीत़ मान्सून तोंडावर आला असताना नाले उपसण्यात आले नाहीत़ याच काळात पाऊस झाला असता तर उद्भवलेल्या परिस्थितीस कोण जबाबदार राहिले असते़ पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे़ त्यावरही कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत असेही त्या म्हणाल्या़ सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत ३० विषयांना मंजुरी देण्यात आली़ समिती सदस्य उमेश चव्हाण, विनय गुर्रम आदींनी या सभेत विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला़
दरम्यान, सोमवारी झालेल्या सभेत सभापती तेहरा यांनी ज्या विभागाचा प्रश्न असेल त्याच विभागाच्या प्रमुखांनी उत्तर देण्याचे आदेश दिले़ सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर एकाच अधिकाऱ्याने किंवा अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलू नये, असे स्पष्ट करताना अधिकाऱ्यांच्या अधिकारशाहीलाच आळा घातला़ (प्रतिनिधी)