सोयाबीनच्या बियाणाची शेतकऱ्यांकडून चाचणी
By Admin | Updated: July 7, 2014 00:19 IST2014-07-07T00:14:19+5:302014-07-07T00:19:06+5:30
पालम : मृग नक्षत्र संपले तरी पावसाची सुरुवात झालेली नाही़ आज ना उद्या पाऊस पडेल या आशेने शेतकरी वर्ग बियाणे खरेदी करीत आहे़ यावर्षी प्रथमच सोयाबीनच्या बियाणाची टंचाई निर्माण झाली आहे़
सोयाबीनच्या बियाणाची शेतकऱ्यांकडून चाचणी
पालम : मृग नक्षत्र संपले तरी पावसाची सुरुवात झालेली नाही़ आज ना उद्या पाऊस पडेल या आशेने शेतकरी वर्ग बियाणे खरेदी करीत आहे़ यावर्षी प्रथमच सोयाबीनच्या बियाणाची टंचाई निर्माण झाली आहे़ बियाणे खरेदी करताना शेतकरी दुकानावरच चाचणी करून खरेदी करीत आहेत़
पालम तालुक्यात मागील वर्षी सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला होता़ परंतु, सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीनच्या उताऱ्यात निम्म्याने घट झाली होती़ यावर्षीही सोयाबीनच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे आहेत़ सोयाबीनचा भाव चार हजाराच्या पुढे गेला होता़ शेतकरी वर्ग सोयाबीन पिकाकडे नगदी पीक म्हणून बघत असतात़ या पिकाला रासायनिक खते व औषधांचा खर्चही कमी येतो़ यावर्षी बाजारपेठेत विविध कंपन्यांची बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ सोयाबीन बियाणाची टंचाई झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे़ पेरणीच्या तोंडावर बियाणांची खरेदी करण्यासाठी गर्दी वाढल्याने भावात वाढ झाली आहे़ दुकानावर सोयाबीनच्या बॅगमधील दाणे काढून शेतकरी उगवण क्षमतेची तपासणी करीत आहेत़ ८० टक्के चाचणीत बियाणे यशस्वी झाले तरच खरेदी केली जात आहे़ पाण्याच्या ग्लासमध्ये बियाणे टाकून थोडावेळ ठेवले जात आहे़ ज्या बियाणावर सुरकुत्या पडतील त्या बियाणाची मोजणी करून उगवण क्षमता ठरविली जात आहे़ ही पद्धत शास्त्रीय असो की नसो शेतकरी मात्र याच चाचणीवरच समाधानी राहत आहेत़ (प्रतिनिधी)
घरच्या बियणाचा वापरास धोका
बाजारपेठेत यावर्षी बियाणांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे़ शेतकऱ्यांनी यावर्षी पेरणीसाठी घरचे बियाणे वापरण्यावर भर दिला आहे़ ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या दर्जाचे बियाणे आहे ते शेतकरी पेरणीसाठी विक्री करीत आहेत़ यावर्षी सोयाबीन बियाणाच्या उगवण क्षमतेची कोणीच शाश्वती देत नाही़ यामुळे प्रक्रिया न करताच बियाणे पेरल्यास भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो़
पावसाची प्रतीक्षा
जून महिना पूर्णत: कोरडा गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ मागील वर्षी सध्याच्या कालावधीच्या काळात पेरणी झालेली होती़ यावर्षी पेरणी अजून किती लांबेल हे सांगणे कठीण आहे़ दररोज आलेला दिवस कोरडा जात असल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढत आहे़ पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून आहे़