सव्वा लाख हेक्टरवर रखडली खरीप पेरणी
By Admin | Updated: August 2, 2014 01:33 IST2014-08-02T00:22:57+5:302014-08-02T01:33:18+5:30
विलास चव्हाण, परभणी जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र ५ लाख ३१ हजार ८१० हेक्टर एवढे असून जूलैपर्यंत केवळ ३ लाख ९७ हजार ९४४ हेक्टरवर म्हणजे ७६ टक्के खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे़

सव्वा लाख हेक्टरवर रखडली खरीप पेरणी
विलास चव्हाण, परभणी
जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र ५ लाख ३१ हजार ८१० हेक्टर एवढे असून जूलैपर्यंत केवळ ३ लाख ९७ हजार ९४४ हेक्टरवर म्हणजे ७६ टक्के खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे़ तब्बल सव्वा लाख हेक्टरवरील पेरणी पावसाविना रखडल्याने बळीराजा चोहोबाजूने अडचणीत सापडला आहे़
गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे़ गतवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते़ अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांनी पिके घेतली़ त्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने रबी पिके होत्याची नव्हती झाली़ त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप व रबी हंगामातील दोन्ही पिके हातची गेली़ त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला़ शासनाकडून हेक्टरी ९ ते १० हजार रुपये पीक नुकसानीची भरपाई दिली़ ही नुकसान भरपाई अद्यापही काही गावातील शेतकऱ्यांना मिळाली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे़ अशा प्रतिकुलतेवर मात करून शेतकऱ्यांनी मे महिन्यात कापसाची लागवड केली़ परंतु, जून महिना कोरडठाक गेल्याने कपाशीचे पीक जळून गेले़ काही शेतकऱ्यांनी पाणी देऊन कपाशीचे पीक जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला़ तसेच जुलै महिन्यात जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला़ या पावसावरच शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर आदी खरीप पिकांची लागवड केली़ परंतु, पेरणी केल्यानंतर दहा ते बारा दिवस पावसाने उघडीप दिल्याने पिके पाण्याविना सुकू लागली आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले महागामोलाची बियाणे , खते व औषधी वाया गेली़ खरिपाची पिके हातची जात असल्याने शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक गणितच विस्कटले आहे़ शासनाकडून अद्यापही शेतकऱ्यांनी मदत जाहीर झाली नाही. तसेच जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. शासनाला कधी जाग येते असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे़ पाऊस न पडल्यामुळे यंदा केवळ ३ लाख ९७ हजार ९४४ हेक्टरवर म्हणजे ७६ टक्के पेरणी झाली आहे़ तर गतवर्षी १०८ टक्के खरिपाची पेरणी पूर्ण झाली होती, अशी माहिती कृषी विभागाने दिली़
कोरडवाहूचे क्षेत्र ६० टक्के
जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र पाच लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे़ यापैकी ४० टक्के जमीन सिंचनाखाली येते़ उर्वरित ६० टक्के शेतीचे क्षेत्र कोरडवाहू आहे़ त्यामुळे यंदा खरीप हंगामातील पिके पाऊस नसल्यामुळे धोक्यात आली आहेत़
कापूस करपला
बागायतदारांनी मे महिन्यात कापसाची लागवड केली; परंतु, जून महिन्यात कडक ऊन पडल्यामुळे कापसाची वाढ खुंटल्या गेली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशी पिकावर नांगर फिरवून सोयाबीनची लागवड केली़ त्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामाच धोक्यात आला आहे.
सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही
दोन वर्षांपासून शेतकरी अडचणीत सापडत आहे़ गतवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिके जोमात आली होती; परंतु, कपाशीवर लाल्या रोग्याचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने शेतकऱ्यांना कपाशीवर केलेला खर्चही निघाला नाही़ त्यानंतर यंदा मात्र शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे शेतात पेरले खरे पण बियाणांची उगवणच झाली नाही़ त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वैरण अथवा भाजीपालाच घेता येणार
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यत खरिपाची पेरणी गरजेची होती. परंतु, पाऊस न पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही़ त्यामुळे जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर जमीन पडीक आहे़ पडीक शेतामध्ये आता केवळ मका, वैरण, ज्वार या जनावरांच्या चाऱ्याची लागवड करता येऊ शकते़ हा चारा जनावरांसाठी उपयोगी ठरणार आहे. तसेच आॅगस्ट मध्ये पाऊस झाल्यास भाजीपाला लागवड केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय पेरणी (हेक्टर)
तालुका कापूस सोयाबीन तूर
परभणी२८,०२४ २१,८४७४,९८९
गंगाखेड१४,८४३ २०,७६२५,६७७
पाथरी२६,५७० १०,०७० ३,३१४
जिंतूर१७,१५० ९,४५० ७,२४०
पूर्णा१३,७७० २१,१७० ३,२७५
पालम९,००० २२,५०० ४,१००
सेलू३०,२२५ १५,६२० ४,०४०
सोनपेठ९,५०० ११,६०० २,५००
मानवत१६,९०० ११,४३० २,०८४
एकूण१,६५,९८२ १,४४,४५२ ६७,२१९