दक्षिण-मध्य रेल्वेचे सिकंदराबादवर प्रेम, मराठवाड्यावर अन्याय! दिवाळीचा प्रवास ‘वेटिंग’वरच
By संतोष हिरेमठ | Updated: October 14, 2025 12:19 IST2025-10-14T12:11:03+5:302025-10-14T12:19:24+5:30
नांदेड, छत्रपती संभाजीनगरसाठी रेल्वे प्रशासनाचा कायम दुजाभाव

दक्षिण-मध्य रेल्वेचे सिकंदराबादवर प्रेम, मराठवाड्यावर अन्याय! दिवाळीचा प्रवास ‘वेटिंग’वरच
छत्रपती संभाजीनगर : दक्षिण-मध्य रेल्वे नेहमीच मराठवाड्यासाठी, त्यातही छत्रपती संभाजीनगरसाठी नव्या रेल्वे देताना दुजाभाव करतेच. पण दिवाळीसाठी काही विशेष रेल्वे सोडण्यातही त्यांची हीच भूमिका कायम आहे. परिणामी, प्रवाशांना दिवाळीत ‘वेटिंग’वरच प्रवास करावा लागणार आहे.
दिवाळीच्या काळात नागपूर, मुंबईसाठी तसेच दक्षिण आणि उत्तर भारतात जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमार्गे विशेष रेल्वे चालवावी, अशी मागणी सातत्याने होत असते. मात्र, ही मागणी पूर्ण होत नाही. ही परंपरा यंदाही कायम आहे. मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिवाळीच्या काळात ‘वेटिंग’वर तिकीट घ्यावे लागत आहे. दिवाळीनंतर मराठवाड्यातून परत मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही ‘वेटिंग’वर तिकीट घ्यावे लागत आहे. ‘वेटिंग’ची तिकिटे कमी करण्यासाठी व प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे चालवण्याचे अधिकार संबंधित झोनला देण्यात आलेले आहेत. परंतु, मराठवाड्याकडे दुर्लक्ष करून सिकंदराबाद, विजयवाडा, हैदराबाद, गुंटूर आदी विभागातील प्रवाशांची ‘सोय’ करण्यावरच ‘दमरे’ भर देत आहे.
रेल्वेचे आरक्षण ‘फुल्ल’
मुंबईला जाणाऱ्या राज्यराणी, जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी, राज्यराणी एक्स्प्रेसचे आगामी १० दिवसांतील आरक्षण ‘वेटिंग’वर गेले आहे. सचखंड एक्स्प्रेसचेही तिकीट मिळणे अवघड झाले आहे.
नागपूरसाठी नियमित नाही, किमान विशेष रेल्वे द्या
दिवाळीसाठी शहरातून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु, छत्रपती संभाजीनगरहून नागपूरसाठी आजघडीला नियमित रेल्वे नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्सशिवाय पर्याय नाही. त्यासाठी अव्वाच्या सव्वा भाडे मोजावे लागते. किमान नागपूरसाठी तरी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी होत आहे.
कुठे सोडल्या विशेष रेल्वे?
नांदेड - निझामुद्दीन, परभणी - जालना, मुंबई - करीमनगर, नांदेड - अनकापल्ली, तिरूपती - साईनगर शिर्डी, जालना - छपरा, जालना - तीरुचानुर आदी विशेष रेल्वे सोडण्यात आल्या, अशी माहिती ‘दमरे’च्या नांदेड विभागातर्फे देण्यात आली.
ट्रॅव्हल्ससोबत साटेलोटे
प्रवाशांची मागणी असणाऱ्या शहरांसाठी रेल्वे सोडण्याकडे दुर्लक्ष करून ट्रॅव्हल्सवाल्यांचा फायदा केला जात आहे. विशेष रेल्वे सोडण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नांदेड, छत्रपती संभाजीनगर भारतात आहे की नाही? असा प्रश्न पडत आहे.
- अरुण मेघराज, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ
या रेल्वेंची मागणी
- छत्रपती संभाजीनगरहून मुंबई, अमरावती-नागपूर, बंगळुरू-म्हैसूर, सुरत, अहमदाबाद, पुणे, नांदेड-मडगाव (नाशिक-पनवेलमार्गे) आदींसाठी विशेष रेल्वेंची मागणी होत आहे.