नागरिकांकडून नावे मागवून ‘समृद्धी’च्या बछड्यांचा लवकरच नामकरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 20:28 IST2019-05-15T20:24:13+5:302019-05-15T20:28:46+5:30
जाहीर प्रगटनाद्वारे व्हॉटस्अॅपवर नावे सुचविण्याचे आवाहन केले जाणार आहे.

नागरिकांकडून नावे मागवून ‘समृद्धी’च्या बछड्यांचा लवकरच नामकरण सोहळा
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील ‘समृद्धी’ या वाघिणीने अलीकडेच चार बछड्यांना जन्म दिला आहे. चारही बछड्यांचे वजन हळूहळू वाढत आहे. सर्वांची प्रकृती अत्यंत ठणठणीत असून, सर्व बछडे दिवसभर आईसोबत दंगामस्ती करीत असतात. त्यांचा नामकरण सोहळा लवकरच पार पडणार असून, त्यासाठी नागरिकांकडून नावे मागविली जाणार आहेत.
सिद्धार्थमधील प्राणिसंग्रहालयात ८ वाघ होते. त्यातील समृद्धी या वाघिणीने २७ एप्रिलला रात्री चार बछड्यांना जन्म दिला. दोन वर्षांनंतर प्राणिसंग्रहालयात पाळणा हलला होता. त्यामुळे पेढे वाटून आनंदोत्सवही साजरा करण्यात आला होता. चारही बछड्यांची प्रकृती दिवसेंंदिवस सुधारत असून, सध्या त्यांचे वजन दोन किलो एवढे झाले आहे. बछड्यांचे नामकरण करण्याचा उपक्रम महापालिकेने काही वर्षांपूर्वी सुरू केला होता. त्यानुसार आता या चार बछड्यांना नावे दिली जाणार आहेत. नागरिकांकडून त्यासाठी नावे मागविली जातील, असे महापौरांनी सांगितले. जाहीर प्रगटनाद्वारे व्हॉटस्अॅपवर नावे सुचविण्याचे आवाहन केले जाणार आहे.