गुंतागुंतीच्या काळात समाज संभ्रमित, त्यामुळे नायक कोण? हा दिग्दर्शकांसमोर पेच: जावेद अख्तर

By राम शिनगारे | Published: January 4, 2024 12:52 PM2024-01-04T12:52:32+5:302024-01-04T12:53:18+5:30

संभ्रमित समाजासोबतच दिग्दर्शकही नायकाच्या शोधात; पद्मभूषण जावेद अख्तर यांचे प्रतिपादन

Society is confused in complex times, so who is the hero? This is a big embarrassment for directors: Javed Akhtar | गुंतागुंतीच्या काळात समाज संभ्रमित, त्यामुळे नायक कोण? हा दिग्दर्शकांसमोर पेच: जावेद अख्तर

गुंतागुंतीच्या काळात समाज संभ्रमित, त्यामुळे नायक कोण? हा दिग्दर्शकांसमोर पेच: जावेद अख्तर

छत्रपती संभाजीनगर : पूर्वीच्या काळी नायक कोण आणि खलनायक कोण आहे, याबद्दल समाजाची भूमिका स्पष्ट होती. परंतु, आजच्या गुंतागुंतीच्या काळात समाजाचीच भूमिका संभ्रमित असल्यामुळे नायक कोण असायला हवा हा दिग्दर्शकांसमोर मोठा पेच आहे, असे प्रतिपादन प्रख्यात गीतकार, संवादलेखक पद्मभूषण जावेद अख्तर यांनी केले.

नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या हस्ते एमजीएम संस्थेतील रुक्मिणी सभागृहात बुधवारी (दि.३) सायंकाळी झाले. यावेळी जावेद अख्तर बोलत होते. यावेळी दिग्दर्शक अनुभव सिन्हा, एनएफडीसीच्या वरिष्ठ अधिकारी गौरी नायर, फिल्म सिटी मुंबईचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, महोत्सव संचालक अशोक राणे, कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी यांची उपस्थित होती. यावेळी ‘पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कारा’ने जावेद अख्तर यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी जावेद अख्तर म्हणाले, २० वर्षांचा असताना मी मुंबईत आलो. देशातील इतर ठिकाणांपेक्षा महाराष्ट्रात साहित्य, संस्कृती, कविता, नृत्य आदी कलेचा सन्मान केला जातो. आपण वेगात प्रगती करीत आहोत. या प्रगतीची ट्रेन वेगात असून, सोबतचे सामान प्लॅटफॉर्मवरच राहिले आहे. साहित्य, संस्कृतीला प्रगतीमध्ये सोडू नये, असेही त्यांनी सांगितले. मुंबई ही व्यावसायिक असली तरी महाराष्ट्रातील इतर शहरे संस्कृती, मूल्य, नैतिकता जाेपासण्याचे काम करीत आहेत. पूर्वीच्या काळात नायक आणि खलनायक कोण, याविषयी समाजात भूमिका स्पष्ट होती. मात्र, आता समाजच संभ्रमित आहे. त्यामुळे लेखकासह दिग्दर्शकांसमोर नायक कोण आणि खलनायक कोणाला करायचे, असा संभ्रम असल्याचेही जावेद अख्तर यांनी सांगितले. दिग्दर्शक आर. बल्की व अनुभव सिन्हा यांनी भारतीय चित्रपटाच्या बदलाचा प्रवास सांगितला. चंद्रकांत कुलकर्णी यांनी महोत्सवामागील भूमिका स्पष्ट केली. अशाेक राणे यांनी महोत्सवाचा प्रवास सांगितला. अंकुशराव कदम यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नंदकिशाेर कागलीवाल यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील रसिकांची गर्दी होती.

प्रत्येकाला करोडपती बनायचंय!
सध्या गरीब-श्रीमंत असे काही राहिले नाही. प्रत्येकाला करोडपती बनायचे आहे. गरिबाला श्रीमंताविषयी काही वाटत नाही. त्यालाही श्रीमंत बनायचे आहे. ही सध्याची वस्तुस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या काळात आम्ही लिहिले ते आता मागे वळून पाहताना विश्वास बसत नाही. पण, आम्ही लिहित गेलो, लोकांना आवडत गेले. ती लोकांची बात होती, मन की बात नव्हती, असेही जावेद अख्तर यांनी आवर्जून सांगितले.

पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनात भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने अंकुशराव कदम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाचा आढावा चित्रफितीच्या माध्यमातून घेण्यात आला.

जावेद अख्तर यांची आज प्रकट मुलाखत
गुरुवारी (दि.४) सायंकाळी ६ वाजता आयनॉक्स, प्रोझॉन मॉल या ठिकाणी जावेद अख्तर यांची प्रकट मुलाखत चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई घेणार आहेत. त्याशिवाय दुपारी २ वाजता आयनॉक्स येथेच दिग्दर्शक आर. बाल्की यांचा मास्टर क्लास होणार आहे. त्याशिवाय तीन स्क्रीन वेगवेगळ्या प्रकारचे १८ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

Web Title: Society is confused in complex times, so who is the hero? This is a big embarrassment for directors: Javed Akhtar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.