एकाच छताखाली सामाजिक न्यायाची कार्यालये
By Admin | Updated: July 20, 2015 00:53 IST2015-07-20T00:32:53+5:302015-07-20T00:53:33+5:30
लातूर : लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे काम पूर्णत्त्वाकडे आहे़ येत्या सहा महिन्यांत राहिलेली

एकाच छताखाली सामाजिक न्यायाची कार्यालये
लातूर : लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे काम पूर्णत्त्वाकडे आहे़ येत्या सहा महिन्यांत राहिलेली किरकोळ कामे सामाजिक न्यायाची सर्व कार्यालये या भवनात थाटली जाणार असल्याची माहिती लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त एल़आय़ वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
लातूर येथील डालडा फॅक्ट्री परिसरात ११ कोटी ६६ लाख रुपये खर्च करुन डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे काम सुरु आहे़ भवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून, आंतर्गत रस्ते व तसेच भवनामधील फर्निचरचे काम सुरु आहे़ राहिलेली किरकोळ कामे सहा महिन्यात पूर्ण होतील, त्यानंतर सामाजिक न्यायाची सर्व कार्यालये या भवनात स्थलांतरीत होणार आहेत़ हिंगोली जिल्ह्यात ६़९२ लाख, नांदेड जिल्ह्यात ११़६६ लाख आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ६ कोटी २४ लाख रुपये खर्च करुन भवन होत आहे़ लातूर, हिंगोली, नांदेड येथील भवनाचे काम अंतिम टप्प्यात असून उस्मानाबाद भवनाचे काम पूर्ण झाले आहे़ येत्या सहा महिन्यात कामे पूर्ण होऊन सामजिक न्यायाची कार्यालये येथे थाटले जातील, असे समाजकल्याण विभागाचे नूतन प्रादेशिक उपायुक्त एल़आय़वाघमारे यांनी सांगितले़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये समाजकल्याण कार्यालय, प्रादेशिक उपायुक्त कार्यालय तसेच विविध महामंडळांची कार्यालय असतील, असेही ते म्हणाले़ सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे अनेक प्रस्ताव महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत़ महाविद्यालयांना समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)