गोगलगायने शेकडो एकरवरील सोयाबीन केलं फस्त, तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांचे हात रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 07:25 PM2023-08-05T19:25:30+5:302023-08-05T19:25:55+5:30

शेतकऱ्यांचा कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप 

Snails destroyed soybeans on hundreds of acres, farmers were left empty-handed despite planting Tibar | गोगलगायने शेकडो एकरवरील सोयाबीन केलं फस्त, तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांचे हात रिकामे

गोगलगायने शेकडो एकरवरील सोयाबीन केलं फस्त, तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांचे हात रिकामे

googlenewsNext

- सुनील घोडके
खुलताबाद:
खुलताबाद तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीन पिकावर लाखो गोगलगायींनी चांगलाच हल्ला चढविला आहे. गोगलगायने शेकडो एकरवरील सोयाबीन पीक फस्त केल्याने दुबार-तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. 

यंदाच्या वर्षी पावसाचे उशिरा आगमन झाल्याने खरीपाच्या पेरण्या उशिरा झाल्या आहेत. खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांची पेरणी केली. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून लाखो गोगलगायी शेकडो एकरवरील सोयाबीन पिकावर हल्ला चढवून उभे पिक फस्त करत आहेत. दुबार- तिबार पेरणी करूनही हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील शेतकरी साहेबरा पुंजाजी श्रीखंडे यांनी तीनदा पेरणी केलेली सोयाबीन गोगलगायींनी फस्त केली आहे. मावसाळा येथील सोमीनाथ गोरे, विजय श्रीखंडे, मनोहर श्रीखंडे, कारभारी यादव वरकड, सोमीनाथ वरकड, संतोष गवळी, कैलास वरकड या शेतक-यांनी सोयाबीनची दुबार पेरणी करूनही सोयाबीन गोगलगायींच्या तावडीतून वाचवू शकले नाही. गोगलगायीचा धुमाकूळ गेल्या दीड महिन्यापासून सुरूच असल्याने अनेक शेतक-यांनी सोयाबीन काढून बाजरी तूरीची लागवड केली आहे. 

कृषी विभागाचे दुर्लक्ष
मावसाळा परिसरात गेल्या दीड महिन्यापासून गोगलगायी सोयाबीन पिकांवर तुटून पडल्या आहेत. उभी पिके या गोगलगायीनी फस्त केली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी कल्पना देवूनही गोगलगायीचा नायनाट करण्याबाबत मार्गदर्शन होत नसल्याचे मावसाळा येथील त्रस्त शेतकरी सोमीनाथ गोरे यांनी सांगितले. 

तिबार केली पेरणी
गोगलगायीने सोयाबीन पिकावर चांगलाच ताव मारला. तिनदा सोयाबीन लावले पंरतू गोगलगायी कोवळी सोयाबीन फस्त करत असल्याचे मावसाळा येथील शेतकरी साहेबराव श्रीखंडे यांनी सांगितले. 

Web Title: Snails destroyed soybeans on hundreds of acres, farmers were left empty-handed despite planting Tibar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.