विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला भरारी, विज्ञान प्रदर्शनात पर्यावरणपूरक साहित्य, स्मार्ट कारचा बोलबाला
By योगेश पायघन | Updated: September 8, 2022 16:49 IST2022-09-08T16:47:19+5:302022-09-08T16:49:10+5:30
तालुकास्तरीय प्रदर्शनातून निवडलेल्या गेलेल्या २८ माध्यमिक तर ४० प्राथमिक शाळांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला भरारी, विज्ञान प्रदर्शनात पर्यावरणपूरक साहित्य, स्मार्ट कारचा बोलबाला
औरंगाबाद : पर्यावरणपूरक साहित्य निर्मिती, हवामानातील बदल आणि आरोग्य, स्वच्छतेसंदर्भात विद्यार्थीनिर्मित कल्पक साहित्य जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बुधवारी पाहायला मिळाले. द जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्मार्ट कार, डस्टबिनसह विविध प्रकल्पांनी लक्ष वेधले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्या हस्ते जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. तालुकास्तरीय प्रदर्शनातून निवडलेल्या गेलेल्या २८ माध्यमिक तर ४० प्राथमिक शाळांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला. गुरुवारी सकाळी ११ वाजता विज्ञान मेळावा आणि नाट्यउत्सव, वक्तृत्व स्पर्धा होईल. यावेळी औरंगाबादच्या गटशिक्षणाधिकारी दीपाली थावरे, विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, जे. व्ही. चौरे, मनीषा वाशिंबे, द जैन इंटरनॅशनल स्कूलच्या शिखा श्रीवास्तव, प्रवीण सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गाडीवाटच्या विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
गाडीवाट येथील जि.प. आदर्श उच्च प्राथमिक शाळेच्या ओंकार कोळगे, मोहसीन नसिर शेख, शुभम कोळगे, गणेश सातपुते या विद्यार्थ्यांनी स्मार्ट कारचे सादरीकरण केले. ड्रायव्हरशिवाय ही कार धावू शकते. मार्गदर्शक शिक्षक दादासाहेब नवपुते म्हणाले, यापूर्वी याच शाळेच्या लाइन फाॅलोअर रोबोट या प्रकल्पाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला होता.
स्मार्ट डस्टबिन
एसबीईएस शाळेच्या प्रथमेश काळे या विद्यार्थ्याने अल्ट्रासॉनिक सेन्सर लावून कचरा पेटी उघडणे. त्याचे वर्गीकरण करता येणे शक्य असल्याचे सांगितले. याशिवाय गोंदेगावच्या एस. बी. शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक तापमानवाढ आणि त्याचे परिणाम दर्शवणाऱ्या प्रकल्पाचे सादरीकरण केले.