कडाक्याच्या थंडीत कार्यालयाबाहेर झोपले; आदिवासी विद्यार्थ्यांचे सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

By बापू सोळुंके | Updated: January 4, 2025 17:51 IST2025-01-04T17:51:14+5:302025-01-04T17:51:51+5:30

विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी गारखेडा परिसरातील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय येथे धरणे धरली आहेत.

Sleeping outside the office in the bitter cold; Tribal students hold protest for second consecutive day | कडाक्याच्या थंडीत कार्यालयाबाहेर झोपले; आदिवासी विद्यार्थ्यांचे सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

कडाक्याच्या थंडीत कार्यालयाबाहेर झोपले; आदिवासी विद्यार्थ्यांचे सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

छत्रपती संभाजीनगर: शासकीय आदिवासी विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी कालपासून आंदोलन छेडले आहे. गारखेडा परिसरातील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयासमोर शेकडो विद्यार्थ्यांचे सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी दिवसभर धरणे आंदोलन सुरू होते. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला गेला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्र्यांशी बोलणे करुन दिल्यानंतरही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही.

शासकीय आदिवासी मुला,मुलींच्या वसतिगृहातील डी.बी.टी. रक्कमेत वाढ करण्यात यावी किंवा पूर्वीप्रमाणे वसतिगृहात भोजन व्यवस्था करण्यात यावी, पंडित दिनदयाल योजनेची डी.बी.टी. रक्कमेत वाढ करावी, शासकीय आदिवासी मुला, मुलींच्या वसतिगृह प्रवेश क्षमता वाढविण्यात यावी,  पोस्टमॅट्रीक शिष्यवृत्ती मागील दोन ते तीन वर्षापासून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही. ही शिष्यवृत्ती तातडीने द्यावी, तसेच यापुढे शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम द्यावी, आदी मागण्यांसाठी शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह आणि विविध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुला,मुलींनी विविध मागण्यासाठी आंदोलन छेडले आहे. 

शेकडो विद्यार्थ्यांनी गारखेडा परिसरातील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय येथे धरणे धरली आहेत. कडाक्याची थंडी असूनही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे न घेताच रात्री मुक्कामही या कार्यालयाबाहेर केला. आज सकाळपासून विद्यार्थी, विद्यार्थिनी जोरदार घोषणा देत होत्या. हमे शिक्षण लेने दो, देश को आगे बढने दो, आमच्या मागण्या पूर्ण करा, शिष्यवृत्तीत वाढ झालीच पाहिजे, अशा घोषणा ते देत होते. या आंदोलनात अॅड. सुभाष गावीत,  गणेश वसावे, सुनील वळवी, गुलाब वळवी, विलास पाडवी, अरुण पावरा, अरुण तडवी, दीपक वसावे आणि महेश पावरा आदींसह शेकडो मुला,मुलींनी सहभाग नोंदविला. 

मंत्र्यांशी फोनवर बोलणे करुन दिले तरी आंदोलन सुरूच
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यासंदर्भात येणाऱ्या अधिवेशनात आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी आंदोलकांना फोनवरुन दिले. मात्र आदिवासी विकास आयुक्त अथवा प्रकल्प संचालकांनी येथे येऊन आम्हाला आश्वासन द्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.

Web Title: Sleeping outside the office in the bitter cold; Tribal students hold protest for second consecutive day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.