महिनाभरात सोळा संगणक, पाच बॅटऱ्यांवर चोरांचा डल्ला
By Admin | Updated: July 30, 2014 00:49 IST2014-07-30T00:21:07+5:302014-07-30T00:49:10+5:30
कोळगाव : गेवराई तालुक्यातील मादळमोही, चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगणक चोरांची टोळी सक्रीय झाली आहे.

महिनाभरात सोळा संगणक, पाच बॅटऱ्यांवर चोरांचा डल्ला
कोळगाव : गेवराई तालुक्यातील मादळमोही, चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगणक चोरांची टोळी सक्रीय झाली आहे. गेल्या काही दिवसात मादळमोही येथील व कोळगाव येथीलही शाळेतील संगणक, बॅटरी व अॅम्प्लीफायरवर चोरांनी डल्ला मारला आहे.
गेल्या काही दिवसात मादळमोही व चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. ग्रामस्थांची नजर चुकवून घरातील छोट्या- मोठ्या वस्तू चोरटे पसार करू लागले आहेत. असे असले तरी चोरट्यांची मजल आता वाढल्याचे दिसून येत आहे.
महिनाभरापूर्वी मादळमोही येथील मोहीमाता विद्यालयातील बारा संगणक व अन्य साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते. या घटनेतील आरोपींचा तपास लागत नाही तोच पुन्हा चोरट्यांनी कोळगाव येथील शाळेतही चोरी करून पोलीसांना आव्हान दिले आहे. कोळगाव येथील नुतन कोळेश्वर विद्यालयाचे रविवारी रात्री चोरट्यांनी कुलूप तोडून चार संगणक, इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्या व एम्प्लिफायर चोरून नेले आहे. याबाबत चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, चोरट्यांनी आपला मोर्चा आता शाळांकडे वळविल्याचे या भागात दिसून येत आहे. त्यामुळे चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी मादळमोही, कोळगावसह परिसरातील नागरिकांतून केली जात आहे. (वार्ताहर)