सहा टप्पे, ९२ कोटींचा निधी; तब्बल ४५ वर्षांनंतर होणार जायकवाडी धरणाची दुरुस्ती
By बापू सोळुंके | Updated: July 13, 2023 19:19 IST2023-07-13T19:17:47+5:302023-07-13T19:19:05+5:30
जागतिक बँकेने धरणाच्या दुरुस्तीसाठी ९२ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, दोन वर्षांनंतरही निधी पडून असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १ मार्च रोजी प्रकाशित केले होते. तेव्हापासून ड्रीप योजनेच्या फायलींना वेग आला.

सहा टप्पे, ९२ कोटींचा निधी; तब्बल ४५ वर्षांनंतर होणार जायकवाडी धरणाची दुरुस्ती
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या ड्रीप (डॅम रिहॅबिटेशन ॲण्ड इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅम) योजनेअंतर्गत पैठण येथील जायकवाडी धरणाची सहा पॅकेजमध्ये ९२ कोटी रुपये खर्च करून दुरुस्ती केली जात आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे (कडा) मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी दिली.
पैठण येथील जायकवाडी धरणाची उभारणी होऊन सुमारे ४५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी होत आहे. तेव्हापासून आतापर्यंत धरणाची विशेष अशी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने ड्रीप योजनेअंतर्गत जायकवाडी धरणाची दुरुस्ती व्हावी, यासाठी प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मंजूर होऊन जागतिक बँकेने धरणाच्या दुरुस्तीसाठी ९२ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, दोन वर्षांनंतरही निधी पडून असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १ मार्च रोजी प्रकाशित केले होते. तेव्हापासून ड्रीप योजनेच्या फायलींना वेग आला. सहा पॅकेजमध्ये धरण दुरुस्ती करण्याचा निर्णय झाला. याविषयी मुख्य अभियंता जयंत गवळी म्हणाले की, जायकवाडी प्रकल्पाच्या दुरुस्तीसह विविध कामांसाठी केंद्र सरकाने ड्रीप योजनेअंतर्गत ९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सहा पॅकेजमध्ये ही दुरुस्ती होणार आहे. या कामाच्या निविदा नुकत्याच ठेकेदारांकडून प्राप्त झाल्या.
असे आहेत सहा टप्पे :
पॅकेज क्र. १ मध्ये मुख्य धरण दुरुस्ती, यासाठी ६२ कोटी रुपयांचा निधी आहे
पॅकेज क्र. २ मध्ये धरणाला जोडणारा रस्ता, धरणाच्या भिंतीवरील १० किलोमीटरचा रस्ता तयार करणे, जायकवाडी येथील विश्रामगृहाची दुरुस्ती इ. कामे केली जातील. यासाठी १८ कोटी रुपये खर्च होतील. या कामाच्या निविदांची तांत्रिक तपासणी सुरू आहे.
पॅकेज क्र. ३ मध्ये धरणातील उपकरणांची दुरुस्ती होईल. हे काम नाशिक येथील मेरी संस्थेच्या वतीने करण्यात येईल. या कामावर ४ कोटी रुपयांचा खर्च होईल.
पॅकेज क्र. ५ अंतर्गत धरणाची फाटकांची दुरुस्ती होईल. यांत्रिकी विभागामार्फत सुमारे ३ कोटी रुपयांचे काम केले जाईल. या कामाच्या निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
पॅकेज क्र. ६ मध्ये धरणाशी संबंधित २ कोटी रुपयांची इलेक्ट्रिकलची कामे होतील.
जायकवाडीवर सीसीटीव्हीची नजर
पॅकेज क्र. ४ अंतर्गत संपूर्ण जायकवाडी धरणाच्या सुरक्षेला शासनाने प्राधान्य दिले आहे. धरणाच्या भिंतीसह मुख्य रस्ता, प्रवेशद्वार, यांत्रिकी विभाग आणि जलविद्युत प्रकल्प इ. ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि देखभाल, दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपये लागतील.