सहा नगरसेवकांचा खाजगी विमानाने प्रवास
By Admin | Updated: July 12, 2014 01:12 IST2014-07-12T00:32:05+5:302014-07-12T01:12:22+5:30
गंगाखेड येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक पोलिस बंदोबस्तात आणि शांततेत पार पडली. नगराध्यक्षपदी भाजपाच्या जयश्री रामप्रभू मुंडे तर उपनगराध्यक्षपदी ज्योती मनोज काकाणी यांची निवड झाली.
सहा नगरसेवकांचा खाजगी विमानाने प्रवास
गंगाखेड येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक पोलिस बंदोबस्तात आणि शांततेत पार पडली. नगराध्यक्षपदी भाजपाच्या जयश्री रामप्रभू मुंडे तर उपनगराध्यक्षपदी ज्योती मनोज काकाणी यांची निवड झाली. या निवडणुकीपूर्वी काही नगरसेवकांना सहलीवर जावे लागले होते. हे नगरसेवक निवडणुकीच्या दिवशी पुणे ते नांदेड खाजगी विमानाने प्रवास करीत गंगाखेड येथे पोहोचले.
नगराध्यक्षपद खेचून आणण्यासाठी आ. सीताराम घनदाट यांच्या पुण्याजवळील नांदूरपठार या गावी सहा नगरसेवकांना अनेक दिवस मुक्कामी रहावे लागले होते. १० जुलै रोजी गंगाखेडला येण्यासाठी नांदूरपठार येथून पुण्याकडे हे नगरसेवक कारने निघाले असता तीन-चार गाड्या त्यांचा पाठलाग करीत असल्याने नगरसेवकांच्या लक्षात आले.
त्यामुळे बस प्रवास करुन गंगाखेडकडे येणाऱ्या या नगरसेवकांनी अचानक आपला मार्ग बदलून खाजगी विमानाने पुणे ते नांदेड असा प्रवास केला व ते नांदेडहून गंगाखेड येथे पोहोचले. यामध्ये माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, राजेश जाधवर, सुनील ठाकूर, मनोहर केंद्रे, नंदू पटेल, शेख अफजलोद्दीन यांचा समावेश होता. सहा महिला नगरसेविका असल्याने त्या गंगाखेड येथेच रामप्रभू मुंडे यांच्या घरी मुक्कामी होत्या.