‘त्या’ बहीण-भावाची नियतीने केली ताटातूट, उपचारादरम्यान घाटीमध्ये तसवीरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 22:50 IST2017-10-22T22:49:52+5:302017-10-22T22:50:11+5:30
घाटी रुग्णालयामध्ये तसवीर गोंडे (२६, रा. भांबडा, करमाड ) या तरुणाचा रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपला भाऊ बरा व्हावा यासाठी दिवस-रात्र जागून काढणारी त्याची बहीण संगीता हिचा लढा अखेर अपयशी ठरला.

‘त्या’ बहीण-भावाची नियतीने केली ताटातूट, उपचारादरम्यान घाटीमध्ये तसवीरचा मृत्यू
औरंगाबाद - घाटी रुग्णालयामध्ये तसवीर गोंडे (२६, रा. भांबडा, करमाड ) या तरुणाचा रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपला भाऊ बरा व्हावा यासाठी दिवस-रात्र जागून काढणारी त्याची बहीण संगीता हिचा लढा अखेर अपयशी ठरला. गेल्या दहा दिवसांपासून घाटीमध्ये आपल्या भावाच्या जिवासाठी तळमळणाºया बहिणीच्या संघर्षाची रविवारी अशी झालेली शोकांतिका पाहून घाटी रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण व नातेवाईकांचे डोळे पाणावले.
बकरीला बांधलेल्या दोरीत पाय अडकून पडल्यामुळे दोन वर्षांपासून तसवीर पलंगावर खिळून होता. पायाला प्लास्टर केले. बरेच देशी उपचारही केले; मात्र तो पूर्णपणे बरा झाला नाही. एकाच जागी खिळून राहिल्यामुळे बेडसोअरचा त्रास उद्भवला. फुफ्फुस लहान असल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पाठीला व हाताला जखमा झाल्या. वडील ज्योतिषी व भिक्षुकी करून परिवाराचे पोट भरतात. त्यामुळे शहरात जाऊन उपचार घेण्याचे आर्थिक पाठबळ नव्हते.
तसवीरची ही शोकांतिका समजताच प्रहार जनशक्ती पक्षाचे सुधाकर शिंदे, रऊफ पटेल, कुणाल राऊत, अमित दांडगे, बाळू भोसले, कल्याण शिंदे हे त्याच्या मदतीला धावले. त्यांनी १३ आॅक्टोबर रोजी तसवीरला घाटी रुग्णालयात वॉर्ड क्र. १७ मध्ये भरती केले. त्याच्या शुश्रूषेसाठी सोबत बहीण संगीताही आली होती. विशेष म्हणजे, दोघांची उंची तीन फूट आहे. घाटीमध्ये ती भावाची जिवापाड काळजी घेत असे. त्यांची हलाखीची परिस्थिती कळल्यावर अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला. ‘लोकमत’मध्ये रविवारी या बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचे व संघर्षाचे वृत्त प्रकाशित झाले. तसवीरची तब्येत सुधारत आहे असे वाटत असतानाच रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार होऊ शकत नाही, असे सांगितले होते; परंतु अलीकडे तो बरा होतोय, हे पाहून सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. रविवारी पहाटे तसवीरने अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण गावकºयांच्या उपस्थितीत रविवारी तसवीरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. के.के. गु्रप व घाटी प्रशासनाचेही सहकार्य लाभले, असे रऊफ पटेल यांनी सांगितले.