सिल्लोड : वृक्षही सजीव आहेत, त्यांनाही वेदना असतात. त्यांच्या या वेदनांवर थोडीशी का होईना फुंकर घालण्यासाठी अभिनव प्रतिष्ठानच्या सदस्य महिलांनी सिल्लोड शहरात खिळेमुक्त झाड अभियान राबविले. झाडांना ठोकलेले खीळे काढून वृक्षांच्या उपकाराची उतराई होण्याच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
अभिनव प्रतिष्ठानच्या सदस्या नगरसेवक अश्विनी किरण पवार यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी पर्यावरण संवर्धन व्हावे, या हेतूने अभिनव प्रतिष्ठाणच्या महिला सदस्यांना सोबत घेऊन परिसरातील झाडांना लोकांनी ठोकलेले खीळे काढण्याचा उपक्रम राबविला. झाडांना बॅनर, दोऱ्या बांधण्यासाठी तसेच विविध कारणांसाठी खीळे ठोकले जातात. वर्षानुवर्षे हे खीळे झाडात रुतून बसतात. या खिळ्यांमुळे झाडांच्या रसवाहिन्या तुटतात. झाडांना जखम होऊन परिणामी झाडास किडही लागते. हे वर्ष युनेस्कोने वृक्षसंवर्धन वर्ष घोषित केले होते. अभिनव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष किरण पाटील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २८ व २९ डिसेंबर रोजी शहर,परिसरातील व अन्वी येथे शिवानंद चापे मित्र मंडळाने ५० हून अधिक झाडांचे खीळे काढून निसर्ग रक्षणाचा उपक्रम राबविला.
चौकट
१ किलो खिळे काढले
महिलांनी उपक्रम राबवित परिसरातील ५० हून अधिक झाडांमधून सुमारे एक किलो खीळे काढले. यासोबतच वडाच्या झाडांना वटपौर्णिमेला महिलांनी बांधलेले दोरेही काढण्यात आले. वृक्ष रोपणा इतकेच महत्व वृक्ष संवर्धनाला असल्याची माहिती अभिनव प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण पाटील पवार यांनी दिली.
चौकट
खिळे ठोकले तर कीड लागते
झाडांना विविध कारणांमुळे खिळे ठोकणे, तार बांधणे, वडाला दोरे बांधणे यामुळे झाडांना इजा होते. खीळे झाडात रुतून बसतात व त्या ठिकाणच्या आसपासचा भाग किडतो व झाडाचे अर्धे आयुष्य कमी होते. एका झाडाला ५ ते १० खीळे ठोकले तरी त्यास मोठी कीड लागते. आम्ही एक प्लकर उपकरण बनविले असून त्याद्वारे झाडांमधून खीळे सहज काढता येतात. त्यानंतर त्या छिद्रात मेन भरले जाते. ज्याद्वारे कीड भरण्यास मदत होते.
- डॉ. संतोष पाटील उपाध्यक्ष अभिनव प्रतिष्ठाण सिल्लोड.
फोटो कॅप्शन : सिल्लोड येथे झाडांमधून खीळे काढताना महिला दिसत आहे.