Sillod Parishad Election Result 2025: सिल्लोडमध्ये 'सत्तार' फॅक्टर! मुलगा नगराध्यक्ष, २५ जागा जिंकून सत्तारांचा भाजपला धोबीपछाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:21 IST2025-12-21T15:10:50+5:302025-12-21T15:21:25+5:30
राज्यात महायुती असली तरी सिल्लोडमध्ये भाजप आणि सत्तार यांच्यात 'छत्तीसचा आकडा' सर्वश्रुत आहे.

Sillod Parishad Election Result 2025: सिल्लोडमध्ये 'सत्तार' फॅक्टर! मुलगा नगराध्यक्ष, २५ जागा जिंकून सत्तारांचा भाजपला धोबीपछाड
सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर): "सिल्लोडमध्ये कोण राहणार, हे इथली जनता ठरवते," हे आमदार अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी निर्विवाद वर्चस्व राखले आहे. भाजपशी असलेल्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सत्तारांच्या शिवसेनेने २५ जागा जिंकत भाजपला अवघ्या ३ जागांवर रोखले. नगराध्यक्षपदी सत्तारांचे चिरंजीव अब्दुल समीर हे पुन्हा एकदा विराजमान झाले आहेत.
भाजप-सत्तार संघर्ष कायम
राज्यात महायुती असली तरी सिल्लोडमध्ये भाजप आणि सत्तार यांच्यात 'छत्तीसचा आकडा' सर्वश्रुत आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची करत सत्तारांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. मात्र, स्थानिक राजकारणात सत्तारांची असलेली पकड भाजपला तोडता आली नाही. मतदारांनी सत्तारांच्या 'सिल्लोड पॅटर्न'ला पुन्हा एकदा पसंती दिली आहे.
अब्दुल समीर यांचा पुन्हा करिष्मा
माजी नगराध्यक्ष असलेले अब्दुल समीर यांनी आपल्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा मतदारांचे मन जिंकले. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला. केवळ नगराध्यक्षच नाही, तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही सत्तारांच्या फौजेने भाजपला कुठेही डोकं वर काढू दिलं नाही.
निकालाचे समीकरण:
एकूण नगरसेवक: २८
शिवसेना (शिंदे गट): २५
भाजपा: ०३
नगराध्यक्ष: अब्दुल समीर (शिवसेना)
या निकालाने हे स्पष्ट झाले आहे की, सिल्लोडच्या राजकारणाची नाडी आजही अब्दुल सत्तार यांच्याच हातात आहे.