सायलेन्स प्लीज ! ‘बुलेट’च्या फटाक्यांवर पोलिसांचा बुलडोझर; ७०५ मॉडिफाइड सायलन्सरचा चक्काचूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 17:33 IST2026-04-11T17:32:58+5:302026-04-11T17:33:42+5:30
मॉडिफिकेशनला लगाम; मॅकेनिक, गॅरेजचालकांवरही कारवाईचा वाहतूक पोलिसांचा इशारा

सायलेन्स प्लीज ! ‘बुलेट’च्या फटाक्यांवर पोलिसांचा बुलडोझर; ७०५ मॉडिफाइड सायलन्सरचा चक्काचूर
छत्रपती संभाजीनगर : धाड-धाड आवाज करत नागरिकांच्या छातीत धडकी भरवणाऱ्या बेजबाबदार दुचाकीचालकांवर वाहतूक विभागाने मोठी कारवाई केली आहे. मार्च महिन्यात तब्बल ७०५ सायलन्सर जप्त करण्यात आले. शुक्रवारी हे सायलन्सर बुलडोझरखाली नष्ट करून वाहतूक पोलिसांनी कृतीतून इशारा दिला.
शहरातील वर्दळीच्या भागांसह जालनारोड, बीड बायपास, जळगाव रोड परिसरात दुचाकीच्या मूळ सायलन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत वेगाने वाहन चालविण्याचे प्रकार वाढले होते. याची दखल घेत पोलिस आयुक्त प्रवीण पवार व उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
मार्च महिन्यात वाहतूक विभागाच्या पाचही शाखांनी १०२८ दुचाकीचालकांवर कारवाई करत ७०५ सायलन्सर जागीच काढून जप्त केले. त्यानंतर दि. १० एप्रिल रोजी पोलिस मुख्यालयात हे सर्व सायलन्सर बुलडोझरखाली टाकून नष्ट करण्यात आले. यावेळी पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, राजेश यादव तसेच सहायक पोलिस निरीक्षक हरेश्वर घुगे, सचिन मिरधे, सुनील कराळे उपस्थित होते.
आता मॅकेनिक, गॅरेजचालकांवरही कारवाई
कंपनीकडून दिलेल्या मूळ सायलेंसरमध्ये बदल करणे बेकायदेशीर आहे. अनेकजण जाणीवपूर्वक कर्णकर्कश आवाजाचे सायलन्सर बसवून रस्त्यावर दहशत निर्माण करतात. त्यामुळे अशा सायलन्सर बसवून देणाऱ्या मॅकेनिक व गॅरेजचालकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिला.