शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ औरंगाबादचे शीख बांधव एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 18:30 IST2020-12-26T18:19:37+5:302020-12-26T18:30:21+5:30
तीनही कृषी कायदे संसदेत चर्चा न करता संमत करण्यात आले आहेत, त्यामुळे ते असंवैधानिक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ औरंगाबादचे शीख बांधव एकवटले
औरंगाबाद: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज औरंगाबादेतील शीख बांधव एकवटले. शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली उस्मानपुरा चौकात आंदोलकांनी भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. तीनही कृषी कायदे संसदेत चर्चा न करता संमत करण्यात आले आहेत, त्यामुळे ते असंवैधानिक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
सकाळी 11 वाजेच्या सुमारास धरणे आंदोलन सुरू झाले.दोन तासानंतर दुपारी एक वाजता हे आंदोलन संपले. शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हा प्रमुख व आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ, माजी महापौर नंदू घोडेले आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आदेशपालसिंग छाबडा, सुरेंद्रसिंग साबरवाल, रणजितसिंह गुलाटी,नवीनसिंग ओबेरॉय, राजेंद्रसिंग जबिंदा, हरीसिंग काचवाला,राजेंद्रसिंग चंढोक आदींनी यावेळी मते मांडली. सरकार अन्नदात्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना सर्वांनीच व्यक्त केली.
शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे..
भारतमाता की जय, वंदे मातरम्, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय न देणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा आंदोलक देत होते. आदेशपालसिंग छाबडा म्हणाले, शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याची हेळसांड या देशात होत आहे. लाखो शेतकरी थंडीत कुडकुडत दिल्लीत आंदोलन करीत आहेत.अनेक शेतकरी प्राणास मुकले तरी केंद्र सरकारला जाग येईना, ही मोठी दु:खाची बाब होय.