श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा

By Admin | Updated: August 18, 2014 00:39 IST2014-08-18T00:23:45+5:302014-08-18T00:39:37+5:30

औरंगाबाद : शेकडो भाविकांनी भजन म्हणत रविवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

Shrikrishna Janmotsav celebrated with enthusiasm | श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा

श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा

औरंगाबाद : ‘नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की’.... शेकडो भाविकांनी असे भजन म्हणत रविवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
शहरातील खाराकुआं परिसरातील द्वारकाधीश मंदिरात श्रीकृष्णाची मूर्ती आकर्षकरीत्या सजविण्यात आली होती. कृष्णजन्माच्या वेळी आरती करण्यात आली. त्यावेळी ‘नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की’ भजन म्हणण्यात भाविक तल्लीन झाले होते. पूजा व आरती जितेंद्र जोशी, लोकेश जोशी, नीलेश जोशी यांनी केली. यानिमित्त मंदिर चांगले सजविण्यात आले होते.
सोमवारी या मंदिरात सकाळी ११ वाजता नंद महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी श्रीकृष्णाच्या मूर्तीला सजविलेल्या पाळण्यात ठेवण्यात येणार आहे. तसेच स्तुती भजन गाऊन आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी भाविकांवर दूध व दह्याचा शिडकावा करण्यात येणार आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सवात शिरीषभाई वकील, योगेश कापडिया, हरीशभाई सोनी, नंदूभाई कापडिया, राकेश शहा, सुभाषभाई गुजराती, नंदलाल कापडिया, शिरीष चौधरी, राजू मेहता, भूषणभाई पटेल, बीना गडिया, विद्या गुजराती, वेदवती पारेख, लताबेन श्रॉफ आदी भाविक हजर होते.
शोभायात्रेने लक्ष वेधले
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी क्रांतीचौक येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. यात श्रीकृष्णावर आधारित देखावे, रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. लेझीम पथकाने आपले उत्कृष्ट प्रात्यक्षिक दाखविले. घोडे, उंटही या रथयात्रेतील आकर्षण ठरले. शोभायात्रा नूतन कॉलनी, पैठणगेटमार्गे खडकेश्वर येथे पोहोचली. शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी होती. यात नंदकुमार गर्गे, राजेश जैन, मोहित देशपांडे, नीलेश शिऊरकर, नारायण चव्हाण, गजेंद्र सिद्ध, कन्हैयालाल शहा आदींचा समावेश होता.
सिडको एन-२
सिडको एन-२, जे-सेक्टर मुकुंदवाडी परिसरातील राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी श्रीकृष्ण यागाचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान व राधाकृष्ण मंदिरात मध्यरात्री श्रीकृष्ण जन्माच्या वेळी पूजा, हवन, पूर्णाहुती व आरती करण्यात आली. यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी सुभाष चौरसिया, विजय निषाद, मुन्नू सहानी, अशोक श्रोत्रिया, नयन तिवारी आदींचा समावेश होता.
श्रीकृष्ण महिमामध्ये सर्व रमले
औरंगपुरा येथील एकनाथ मंदिरात रात्री ‘श्रीकृष्ण महिमा’ हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम पार पडला. गायक राम विधाते व बजरंग विधाते यांनी कृष्णभक्तीची गीते सादर केली. यानंतर श्रीकृष्णाच्या जीवनचरित्रावर हभप अ‍ॅड. गंगाधर घुगे महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी बापूराव वाळके, अ‍ॅड. रावसाहेब बोर्डे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने हजर होते.

Web Title: Shrikrishna Janmotsav celebrated with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.