श्रावणाने महासणोत्सवास प्रारंभ

By Admin | Updated: July 27, 2014 01:19 IST2014-07-27T01:01:01+5:302014-07-27T01:19:46+5:30

औरंगाबाद : ज्याची लहान-थोर चातकाप्रमाणे वाट बघत असतात तो श्रावण महिना २७ जुलैपासून सुरू होत आहे.

Shravan to start the festival | श्रावणाने महासणोत्सवास प्रारंभ

श्रावणाने महासणोत्सवास प्रारंभ

औरंगाबाद : ज्याची लहान-थोर चातकाप्रमाणे वाट बघत असतात तो श्रावण महिना २७ जुलैपासून सुरू होत आहे. श्रावणासोबतच सण आणि उत्सवांनाही सुरुवात होत आहे. पहिले मंगळागौरपूजन २९ रोजी साजरे होणार आहे. आॅगस्ट महिन्यात नागपंचमी, राखी पौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला व पोळा, असे एकानंतर एक सण आहेत. शहरात यानिमित्ताने घरोघरी तयारी सुरू झाली आहे. विविध भागांतील महादेव मंदिर व शनी मंदिरात रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक घरांमध्ये मंगळागौरीपूजनाची तयारी सुरू आहे. मंगळागौरीच्या गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यासाठी विविध महिला मंडळांनीही सराव सुरू केला आहे. राख्यांची दुकाने सजली आहेत. शहरातील ठराविक भागात युवक मंडळांनी दहीहंडीची प्रॅक्टिस सुरू केली आहे. श्रावण आगमनाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रावणात जोरदार पाऊस पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
श्रावणी सोमवार
भगवान महादेवाची रोज पूजा केली जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी पूजा केल्यास जास्त पुण्य लाभते, अशी श्रद्धा आहे. यामुळे श्रावणात प्रत्येक चार सोमवारी ठिकठिकाणच्या महादेव मंदिरांत भक्तांची गर्दी होते. शहरातील जुन्या मंदिरांपैकी एक खडकेश्वर येथील महादेवाचे मंदिर. येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. येथील छोट्याशा मैदानावर श्रावणी सोमवारी जणू यात्राच भरत असते. मंदिरात रुद्राभिषेक करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पळशी रोडवरील पारदेश्वर शिव मंदिरात सकाळी व सायंकाळी ६ वाजता आरती केली जाते. सकाळी पूजा व रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे म्हणून येथे मंडप टाकण्यात येत आहे. श्रावणी सोमवार २८ जुलै, ४ , ११, १८ व २५ आॅगस्ट या तारखा आहेत.
नववधंूचा सण मंगळागौर
लग्न झाल्यानंतर नववधू पहिल्या श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत भक्तिभावाने करतात. या दिवशी घरासमोर रांगोळी काढली जाते. मंगळागौरीची भव्य पूजा मांडली जाते. आसपासच्या नववधू एकत्र येऊनही पूजा करतात. यानंतर सर्वजणी मिळून मंगळागौरीची गाणी गात विविध खेळ खेळतात. यात झिम्मा, फुगडी, खुर्ची की मिरची आदी खेळांचा समावेश असतो. मंगळागौरीची गाणी व विविध खेळ खेळण्यासाठी खास महिला मंडळे पुढे आली आहेत. हैदराबाद बँकेतील महिला कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून दर मंगळवारी मंगळागौरीची गाणी गातात व खेळ खेळतात. तसेच संस्कृती ग्रुपनेही यासाठी तयारी सुरू केली आहे. ग्रुपच्या सदस्य रोज विविध प्रकारची गाणी व खेळांचा सराव करीत आहेत. मंगळागौर मंगळवारी २९ जुलै, ५, १२ व १९ आॅगस्ट रोजी आहे.
नागपंचमी
श्रावण महिन्यात शुक्ल पंचमीला येणारा हा सण निसर्गातील प्राण्यांविषयी लोकांना जाणीव करून देणारा आहे. शेत नांगरतांना वारूळ नाहीसे होऊ नये. या विचाराने नागांचे रक्षण करण्याचा संदेश देणारा हा सण आहे. या दिवशी सुवासिनी वारूळ व नागाची पूजा करतात. ग्रामीण भागात गावशिवारात वारूळ असतात; पण शहरातील सिमेंटच्या जंगलात वारूळ कुठून सापडणार. शहरात नागाची छायाचित्रे विकत मिळतात. तीच भिंतीवर लावून त्यांची पूजा केली जाते. नागपंचमीला झोका खेळण्याची प्रथा आहे. खोकडपुरा, बेगमपुरा, छावणी, पदमपुरा, कर्णपुरा, सिडकोतील आंबेडकरनगर, एन-७, हर्सूल, मुकुंदवाडी, चिकलठाणा परिसरातील वडाच्या झाडाला झोके बांधून मुली, तरुणी व महिला झोके खेळतात.
राखीपौर्णिमा
श्रावणातील पौर्णिमेला राखीपौर्णिमा साजरी केली जाते. बहीण-भावाच्या अतूट बंधनाचा सण म्हणून या सणाकडे बघितले जाते. बहीण भावाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे भावाकडून वचन घेते. शहरातील काही राजकीय पक्ष तसेच महिला मंडळ यानिमित्ताने सार्वजनिक उपक्रम राबवीत असतात. काही महिला मंडळे हर्सूल कारागृहातील कैद्यांना राखी बांधतात. शहरातील मूकबधिर मुलांच्या शाळेत, शहरातील भारतीय समाजसेवा केंद्र व साकार संस्था या अनाथालयातही राखीपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. वाहने, वह्या, पेन, कॉम्प्युटरलाही राखी बांधली जाते. काही शाळांच्या वतीने मोठी राखी तयार करून वृक्षांनाही राखी बांधली जाते. अशीच मोठी राखी वन विभागाच्या वतीने खास कार्यक्रमात एका झाडाला बांधली जाते.
गोकुळाष्टमी
श्रावणातील कृष्णाष्टमीला श्रीकृष्णजन्माचा उत्सव साजरा केला जातो. मध्यरात्री श्रीकृष्णजन्मानिमित्त भजनाचा कार्यक्रम केला जातो. शहरातील खाराकुआँ परिसरातील द्वारकेश्वर मंदिर, पैठण रोडवरील महानुभाव आश्रमात गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम शहरातील विविध भागांत घेण्यात येते. विविध राजकीय पक्ष, मित्रमंडळांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन केले जाते. गुलमंडी, औरंगपुरा, अहिल्याबाई होळकर चौक, कॅनॉट गार्डन, टीव्ही सेंटर आदी परिसरात दहीहंडीची स्पर्धा चांगलीच रंगते. जास्तीत जास्त दहीहंड्या फोडून नंबर वन राहण्यासाठी चेलीपुरा, राजाबाजार, जाधवमंडी, बेगमपुरा, पदमपुरा, सिडको एन-६, एन-७, एन-९, टीव्ही सेंटर भागातील गोविंदापथके प्रयत्नशील असतात.
पोळा
श्रावणी अमावास्येला पोळा सण साजरा केला जातो. यानंतर श्रावण महिना संपून भाद्रपद महिन्याला सुरुवात होते. शेती व्यवसायातही यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झाले असले तरीही शेतात राबणाऱ्या बैलांचे महत्त्व अजूनही कमी झाले नाही. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या बैलजोडीची पूजा करून त्याच्या कष्टाचे आभार व्यक्त करण्याचा हा सण. या दिवशी बैलांना अंघोळ घालून सजविण्यात येते. त्यांची मिरवणूक काढली जाते. घरोघरी बैलांची पूजा केली जाते. औरंगाबादेत चिकलठाणा, हर्सूल, जटवाडा, सातारा, देवळाई, पैठण रोड, पंढरपूर आदी भागांत बैलजोडीची मिरवणूक काढली जाते. या दिवशी बैलांच्या स्पर्धा घेतल्या जात. आता त्यावर बंदी आहे. शहरात मातीची बैलजोडी विकत आणून तिची पूजा केली जाते.

Web Title: Shravan to start the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.