नैराश्येतूनच श्रद्धाची आत्महत्या

By Admin | Updated: September 17, 2014 00:52 IST2014-09-17T00:41:47+5:302014-09-17T00:52:15+5:30

वडिलांनी दिला पोलिसांत जबाब

Shradhata suicide due to depression | नैराश्येतूनच श्रद्धाची आत्महत्या

नैराश्येतूनच श्रद्धाची आत्महत्या

कोल्हापूर : एम.बी.बी.एस.च्या प्रथम वर्षात गेली चार वर्षे नापास झाल्याच्या नैराश्येतून मुलगी श्रद्धा करे (वय २२, रा. रायगड नगर, सिडको कॉलनी, बळिराम पाटील विद्यालयाजवळ औरंगाबाद) हिने आत्महत्या केल्याचा जबाब सोमवारी रात्री वडील गंगाधर करे यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत दिला. आज, मंगळवारी पहाटे शोकाकुल वातावरणात खासगी वाहनातून तिचा मृतदेह गावी नेण्यात आला.
राजर्षी शाहू छत्रपती महाराज वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या दसरा चौकातील वसतिगृहाच्या चाळीस फूट उंच असलेल्या चौथ्या मजल्यावरून श्रद्धा करे हिने उडी घेऊन आत्महत्या केली होती. मानसिक ताण-तणावातून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. तिचे आई-वडील, मामा व इतर नातेवाईक सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास सीपीआरमध्ये आले. श्रद्धाचा मृतदेह सीपीआरच्या शवगृहात ठेवला होता. मृतदेह पाहून आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. श्रद्धाचे आई-वडील आल्याचे समजताच तिच्या मैत्रिणींही सीपीआरमध्ये आल्या. आई-वडिलांसह मैत्रिणींच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला. मध्यरात्री एकच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. श्रद्धाचे वडील औरंगाबाद येथे एस.टी. महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये नोकरीस आहेत तर आई गृहिणी आहे. तिला एक भाऊ व बहीण आहे.

‘तो’ फोन वडिलांचा
श्रद्धाला सकाळी साडेआठच्या सुमारास मोबाईलवर वडिलांशी बोलली असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मी परीक्षेला चालले आहे, असे तिने आनंदाने सांगितले. माझ्यासह आई, भाऊ, बहिणीचीही तिने विचारपूस केली. आम्ही सर्वांनी तिला अभ्यासाची तयारी झाली आहे का, असे म्हणून परीक्षेसाठी शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर पुन्हा पंधरा मिनिटांनी ती परीक्षेला पोहोचली का, हे पाहण्यासाठी फोन केला असता ती इमारतीवरून पडून जखमी झाल्याचे समजले.

प्रयत्न कर यश मिळेल
लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक के. एल. मुजावर यांनी मुलीने टोकाची भूमिका घेण्यापाठीमागे कारण काय असावे, आपली कोणाबाबत तक्रार आहे का? असा प्रश्न वडिलांना केला. यावेळी त्यांनी ती सलग चार वर्षे एम.बी.बी.एस.च्या प्रथम वर्षात नापास झाल्याने मानसिक तणावाखाली होती. अपयशामुळे ती नेहमी उदास असायची; परंतु माझं काम होतं तिला शिकविण्याचं. तिला धीर देत आम्ही ‘प्रयत्न कर, यश नक्कीच मिळेल.’ असे सांगत होतो. परंतु ती असा निर्णय घेईल हे आम्ही स्वप्नातही पाहिले नव्हते.

Web Title: Shradhata suicide due to depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.