उड्डाणपूल की ‘शोपिस’?
By Admin | Updated: August 2, 2014 01:31 IST2014-08-02T00:17:04+5:302014-08-02T01:31:33+5:30
गंगाखेड : शहरातील रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम तीन वर्षांपासून रेंगाळले आहे. केवळ सांगाडा उभा करुन ठेवण्यात आला असून, शहरातील व महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
उड्डाणपूल की ‘शोपिस’?
गंगाखेड : शहरातील रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम तीन वर्षांपासून रेंगाळले आहे. केवळ सांगाडा उभा करुन ठेवण्यात आला असून, शहरातील व महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
गंगाखेड - नांदेड प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ या मार्गावर गंगाखेड रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे पटरीवरील वाहतुकीचा अडथळा दूर व्हावा, या उद्देशाने केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले. तीन वर्षांपासून हे काम सुरू आहे. या पुलाचा फक्त सांगाडा उभा करण्यात आला आहे. प्रशासनही यात लक्ष घालत नसल्याचे दिसत आहे. गंगाखेड रेल्वे उड्डाणपुलाचे २५ ते ३० कोटींंचे काम असून, त्यातील केंद्र शासनाच्या हिस्स्याचे काम पूर्ण झाले. सांगाडा उभा करण्यासाठी ६ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. उर्वरित काम राज्य शासनाचे आहे. यासाठी २२ कोटीचा निधी मंजूरही झालेला आहे. गुत्तेदाराविना काम लटकले आहे. हा प्रमुख राज्य मार्ग असल्यामुळे हे काम त्वरीत होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
पुण्याचा गुत्तेदार
केंद्र व राज्य शासन यांच्या बजेटमधून रेल्वे उड्डाणपुलाचे काम होणार आहे. केंद्र शासनाचे काम पूर्ण झाले आहे. आता काम बाकी आहे ते राज्य शासनाचे शासनाने पुणे येथील शासकीय गुत्तेदारावर हे काम सोपविले आहे. आता हा गुत्तेदार उड्डाणपुलाच्या उर्वरित कामाचा प्रारंभ कधी करतो, याकडे गंगाखेडवासियांचे लक्ष लागून आहे.
रेंगाळलेल्या कामांमुळे वाहतुकीस अडथळा
येथील रेल्वे गेटच्या पुलाचे काम चालू आहे. हे काम मध्यंतरी बंद पडल्यामुळे रेल्वे गेटजवळील वाहतूक तासन्तास ठप्प होऊन वाहतूक विस्कळीत होते. वाहनधारकांना बराच वेळ गेटलगत थांबावे लागत असल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडत आहे.
पस्तीस वेळा होते गेट बंद
गंगाखेड रेल्वे मार्गावरुन रेल्वे गाड्यांची ये-जा वाढलेली आहे. त्यामुळे दिवसाकाठी ३० ते ३५ वेळेला रेल्वे गेट बंद केले जाते आणि वाहतुकीची कोंडी होते. विशेष करुन मालगाडी येताना किंवा जाताना बराच काळ गेट बंद ठेवावे लागते. परिणामी वाहनधारकांना ताटकळ बसावे लागते.