कळंब येथील तरूणाच्या शिल्पांचे मुंबईत प्रदर्शन
By Admin | Updated: June 9, 2014 00:09 IST2014-06-08T23:41:11+5:302014-06-09T00:09:36+5:30
कळंब : कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील राम कुंभार या तरुण शिल्पकाराच्या शिल्पकलेचे प्रदर्शन सध्या मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरु आहे.

कळंब येथील तरूणाच्या शिल्पांचे मुंबईत प्रदर्शन
कळंब : कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील राम कुंभार या तरुण शिल्पकाराच्या शिल्पकलेचे प्रदर्शन सध्या मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरु आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून शिल्पकलेचे धडे घेतलेल्या रामचा हा कलाप्रवास प्रेरणादायी आहे.
तालुक्यातील कन्हेरवाडी येथील कुंभार परिवाराचा मातीची भांडी बनविण्याचा पारंपारिक व्यवसाय आहे. याच परिवारातील राम याला या कलेचे बाळकडू मिळाले होते. मातीमध्ये खेळत मातीलाच आकार देताना त्याची विविध रुपेही राम साकारु लागला. त्याच्यातील कलाकाराने त्याला स्वस्थ बसू दिले नाही. शिल्पकलेचे तंत्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी हलाखीच्या परिस्थितीतही रामने मुंबई गाठली. येथील जे.जे. स्कूल आॅफ आर्टस्मध्ये त्याने शिल्पकलेचे व्यावसायिक शिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्याच्या कलेची चमक शिक्षण घेतानाही दिसून आली. शिल्पकलेत त्याला १० राज्यस्तरीय तर १ राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. जे.जे. महाविद्यालयाची नामांकित फेलोशिपही त्याने प्राप्त केली आहे.
कळंबसारख्या ग्रामीण भागातून गेलेल्या रामच्या शिल्पकलेचे सध्या मुंबई येथील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन सुरु आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार वासुदेव कामत यांनीही रामच्या शिल्पकलेचे कौतुक केले. ‘रामची शिल्पे ग्रामीण जीवनपट सादर करतात’, अशा शब्दात त्यांनी या कलेचा गौरव केला.
या प्रदर्शनात रामने भारतीय संस्कृतीतील पारंपरिक खेळ शिल्पकलेच्या माध्यमातून सादर केले आहेत. ग्रामीण जीवनातील अविभाज्य घटक असलेले, बालवयातील मातीशी जोडणारे हे खेळाचे प्रकार शिल्पकलेच्या माध्यमातून जगासमोर सादर करण्याचा प्रयत्न केल्याचे राम कुंभार यांनी सांगितले.
या प्रदर्शनाला भेट दिलेल्या अनेक मान्यवरांनीही रामच्या शिल्पकृतींचे कौतुक केले. ग्रामीण भागातील कला व कलाकारांना संधी मिळाली की मातीचे बंध न तोडता ती आभाळांशी संवाद साधू लागते. कन्हेरवाडीच्या रामनेही मातीलाच साधन बनवून शिल्पकलेच्या आकाशात भरारी मारण्यासाठी पंख पसरल्याचे या प्रदर्शनावरुन दिसून येत आहे. (वार्ताहर)