धक्कादायक ! १ लाख रुपयात पत्नीने दिली पतीच्या खुनाची सुपारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 18:26 IST2021-10-23T18:26:14+5:302021-10-23T18:26:31+5:30
चिकलठाणा पोलिसांची चार आरोपींना केले गजाआड

धक्कादायक ! १ लाख रुपयात पत्नीने दिली पतीच्या खुनाची सुपारी
औरंगाबाद : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नी व तिच्या प्रियकराने दोघांना १ लाख रुपयांत खुनाची सुपारी दिली; परंतु सावज बाहेर सापडत नसल्यामुळे पत्नीने प्रियकरासह या कॉन्ट्रॅक्ट किलर्संना घरीच बोलावले. ते झोपेत असतानाच चौघांनी मिळून खून केल्याचा उलगडा चिकलठाणा पोलिसांनी २४ तासांच्या आत केला. चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पिसादेवी येथील पुलाखाली रामचंद्र रमेश जायभाये (रा. कुंभेफळ, जि. बुलडाणा, ह. मु. आईसाहेबनगर, पिसादेवी रोड, हर्सूल) यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना गुुरुवारी सकाळी दिसला. मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन जाधव यांनी त्याची ओळख पटविली. प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी संशयावरून रामचंद्रची पत्नी मनीषाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पुराव्याशिवाय प्रश्न विचारायचे नाहीत, असा दम पत्नी पोलिसांना देत होती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला होता. रामचंद्र यांचा भाऊ कृष्णा जायभाये यांनी मनीषा व तिचा प्रियकर समाधान ऊर्फ गणेश रघुनाथ फरकाडे (रा. बनकिन्होळा, ता. सिल्लोड) या दोघांनीच खून केल्याची तक्रार चिकलठाणा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून मनीषा व समाधानच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
ठाणेदार गजानन जाधव यांनी गुुरुवारी रात्री पथक पाठवून समाधान फरकाडे यास भोकरदन येथून ताब्यात घेतले. सुुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने सुपारी देऊन खून केल्याचे कबूल केले. रामचंद्र यांचा खून करण्यासाठी मनीषा व समाधान यांनी राहुल सावंत (रा. सातारा परिसर) व निकितेश मगरे (रा. बालाजीनगर) या दोघांना १ लाख रुपयांची सुपारी महिनाभरापूर्वी दिली होती. यासाठी राहुलच्या बँक खात्यात २५ हजार रुपये समाधान याने वर्ग केले. राहुल महिनाभरापासून रामचंद्र यांच्या मागावर होता. मात्र, त्यास खून करण्याची संधी मिळाली नाही. बुधवारी रात्री रामचंद्र घरी झोपलेले असताना पत्नी मनीषाने प्रियकरासह राहुल आणि निकितेश या तिघांना बोलावून घेतले. रामचंद्र झाेपलेल्या खोलीतच चौघांनी पकडून मान, गळा कापला. खून केल्यानंतर मृतदेह दुचाकीवर मध्यभागी ठेवून पिसादेवी येथील पुलावरून पाण्यात फेकला. पुलावरून पडून मृत्यू झाला असा देखावा करण्यात आला.
पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन जाधव, उपनिरीक्षक बालाजी ढंगारे, अशोक रगडे, हवालदार आजिनाथ शेकडे, रवींद्र साळवे, दीपक देशमुख, दीपक सुरवसे, विशाल नरवडे, गणेश खरात, सचिन रत्नपारखी, तनुजा गोपाळघरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
पहाटे उचलले कॉन्ट्रॅक्ट किलर
आरोपींनी खून केल्यानंतर रक्ताने माखलेले कपडे एका ठिकाणी जाळून टाकले. तसेच ते शस्त्र फेकून दिले. हे सर्व पुरावे चिकलठाणा पोलिसांनी शोधून जमा केले आहेत. कॉन्ट्रॅक्ट किलर राहुल सावंत व निकितेश मगरे या दोघांना गुुरुवारी पहाटेच उचलण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.