खळबळजनक! हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा पित असताना तरुणास चाकूने भोसकले
By सुमित डोळे | Updated: January 5, 2024 19:58 IST2024-01-05T19:57:03+5:302024-01-05T19:58:30+5:30
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना

खळबळजनक! हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा पित असताना तरुणास चाकूने भोसकले
छत्रपती संभाजीनगर : जिन्सी परिसरात नववर्षाच्या सुरूवातीलाच खुन झाला. हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा पित असलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. साजेब खान शकिल खान (२२, रा. गल्ली क्रं. १५, बायजीपुरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याच्यासोबतच्या मित्रावरही मारेकऱ्याने चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी दुपारी ४ वाजता बायजीपुऱ्यात हि घटना घडली.
साजेब मित्र सय्यद फैजल सय्यद शायकत (२२, रा. अल्तमश कॉलनी) याच्यासोबत शुक्रवारी दुपारी घराजवळीच एका चहाच्या हॉटेलमध्ये गेला होता. गप्पा मारत असतानाच तेथे त्याच्याच परिसरात राहणारा एक तरुणाने जात थेट शिविगाळ केली. काय झाले हे कळायच्या आतच मारेकऱ्याने खिशातून चाकू काढून साजेबवर वार केले. यात साजेब गंभीर जखमी होऊन खुर्चीवरुन खाली कोसळला. त्याच्यावरील वार थांबवण्यासाठी धावलेल्या सय्य्द फैजलवर देखील मारेकऱ्याने वार केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या साजेबला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र, काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. खोल जखम व अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना
घटनेची माहिती कळताच निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक निरीक्षक अनिल मगरे, उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी परिसरातीच असल्याचे कळाल्यानंतर दोन पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाले. तर जखमी सय्यद फैजल ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा देखील पोलिसांनी जबाब नोंदवला.